जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाजवळ एक मोठा अपघात घडला आहे. पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. रेल्वे क्रॉसिंग गेट तोडून धान्याने भरलेला ट्रक थेट रुळांवर घुसला आणि त्याच वेळी मुंबई-अमरावती एक्सप्रेस तिथून जात होती. वेगात असलेल्या एक्सप्रेसने या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातामुळे काही काळासाठी रेल्वे वाहतूक ठप्प झाली. या धडकेत ट्रक पूर्णपणे उद्ध्वस्त झाला, तसेच रुळांवर धान्याचे पोते विखुरल्याचे दिसून आले. मात्र, सुदैवाने रेल्वेचा वेग तुलनेत कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर रेल्वे प्रशासन आणि अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनीही बचावकार्य सुरू करून मदतीचा हात पुढे केला.
या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र काही प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
मुंबई-हावडा रेल्वेमार्गावर या अपघाताचा मोठा परिणाम झाला असून अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून ट्रॅकवरील ट्रक हटवण्याचे काम सुरू असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तसेच, या अपघातामुळे रेल्वे ट्रॅकचे किती नुकसान झाले याची पाहणी रेल्वे अधिकाऱ्यांकडून केली जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अपघाताच्या वेळी जोरदार आवाज झाला आणि अचानक गोंधळ उडाला. पहाटेच्या वेळी झालेल्या या घटनेमुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून तातडीने पावले उचलली जात आहेत.
Leave a Reply