मुंबईत परवडणाऱ्या घरांच्या नावाखाली ११ घर खरेदीदारांची तब्बल १.८ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या फसवणुकीचा मास्टरमाइंड एक महिला असल्याचे उघड झाले असून, फसवणूक झालेल्यांमध्ये तीन ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे.
MHADA च्या नावाखाली गंडा
कालाचौकी पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेसह तिच्या १३ साथीदारांविरोधात फसवणूक आणि विश्वासघाताच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये त्या व्यक्तीचाही समावेश आहे, ज्याच्या बँक खात्यात फसवणूक केलेली रक्कम जमा करण्यात आली होती.
फसवणूक करणाऱ्या महिलेनं पीडितांना MHADA च्या 10% कोट्यातून किंवा रस्ता रुंदीकरणात मिळालेल्या घरांपैकी फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. विश्वास मिळवण्यासाठी तिने आपल्या ड्रायव्हरला MHADA चा वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवले. यामुळे फसवणूक झालेल्या व्यक्तींना वाटले की त्यांचे अर्ज लवकरच मंजूर होतील.
या प्रकरणातील एका पीडिताने, जो MTNL मधून निवृत्त झालेला कर्मचारी आहे, पोलिसांना सांगितले की, 2021 मध्ये त्याला मुंबईत घर घ्यायचे असल्याची माहिती त्याने आपल्या मेहुण्याला दिली होती. त्यानंतर त्या नातेवाइकाने त्याला या महिलेशी संपर्क करून दिला. महिलेनं मला MHADA च्या 10% कोट्यातून किंवा रस्ता रुंदीकरण योजनेअंतर्गत सवलतीत फ्लॅट मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तिने मला सिव्हरी भागात एक फ्लॅट दाखवला आणि त्याची चावीही दिली. त्यामुळे आम्हाला खात्री वाटली की, व्यवहार खरा आहे, असे निवृत्त कर्मचाऱ्याने सांगितले.त्यांनी या महिलेच्या सांगण्यावर विश्वास ठेवून वेगवेगळ्या बँक खात्यात एकूण 30.42 लाख रुपये जमा केले. मात्र, नंतर महिलेनं कोणतेही अधिकृत कागदपत्र किंवा वाटप पत्र न देता गायब झाली.
2023 च्या उत्तरार्धात, या पीडित व्यक्तीस समजले की, अजून 10 जण या टोळीकडून फसवले गेले आहेत. त्याने आरोपी महिलेशी संपर्क साधला असता, तिने सुरुवातीला 2.22 लाख रुपये परत केले, मात्र नंतर तिचा संपर्क तुटला. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आरोपींना शोधण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत.
या प्रकरणामुळे परवडणाऱ्या घरांच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीकडे अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. कोणत्याही व्यवहारात अधिकृत कागदपत्रे आणि सरकारकडून मान्यता असलेले पुरावे घेणे आवश्यक आहे.
Leave a Reply