गुजरातच्या २००२ मधील दंगल प्रकरणावर मोदींनी सोडलं मौन; पहिल्यांदाच मांडली भूमिका

अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष मुलाखत नुकतीच प्रसारित झाली. जवळपास तीन तास चाललेल्या या संवादात पंतप्रधान मोदींनी त्यांच्या जीवनप्रवासाबरोबरच देशातील विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा केली. यामध्ये भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंधांबाबत मत व्यक्त करत त्यांनी २००२ मधील गुजरात दंगल प्रकरणावर पहिल्यांदाच भूमिका मांडली.

गुजरात दंगलीबाबत मोदींचं स्पष्टीकरण
२००२ मधील गुजरात दंगलींवर प्रश्न विचारला असता, मोदी म्हणाले, “त्या काळात माझ्यावर अनेक प्रकारचे आरोप झाले. २००२ च्या दंगलीभोवती एक खोटी कहाणी तयार करण्याचा प्रयत्न झाला. याआधी गुजरातमध्ये २५० हून अधिक दंगली घडल्या होत्या. १९९९ मध्ये कंधार अपहरण, २००० मध्ये लाल किल्ल्यावर हल्ला, आणि २००१ मध्ये संसदेवर हल्ला झाला होता. त्या काळात देशभरात अस्थिरतेचं वातावरण होतं. पण २००२ नंतर गुजरातमध्ये कोणतीही मोठी दंगल घडलेली नाही. आज गुजरातमध्ये कायमस्वरूपी शांतता आहे.ते पुढे म्हणाले, “त्या काळात आमच्या सरकारने स्थिरता आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, काही राजकीय विरोधक आणि माध्यमांच्या विशिष्ट गटांनी आमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. खोट्या कहाण्या तयार करण्यात आल्या, पण शेवटी न्यायाचाच विजय झाला. न्यायालयाने मला निर्दोष ठरवलं.”

टीकेवर मोदींचं प्रत्युत्तर

टीकेबाबत विचारता मोदी म्हणाले, “टीका ही लोकशाहीचा आत्मा आहे. आपले धर्मग्रंथही सांगतात की टीकाकारांना जवळ ठेवा, कारण तेच आपल्याला सुधारण्यात मदत करतात. मात्र, आजकाल काही माध्यमं आणि राजकीय विरोधक तथ्यविहीन आरोप करतात. शॉर्टकट घेऊन व्यक्त केलेली टीका ही टीका नसते, ती केवळ आरोपांची मालिका असते.” ते पुढे म्हणाले, “२००२ पूर्वीच्या हिंसाचाराच्या इतिहासाची पर्वा न करता माझ्यावर टीका केली गेली. गुजरातमध्ये झालेल्या बदलांमध्ये त्यांना रस नव्हता. त्यांचा उद्देश फक्त त्यांच्या राजकीय अजेंड्याला पोषक कथा तयार करण्याचा होता. अनेक दशकांपासून काही गट मतांसाठी खूश ठेवण्याचा प्रयत्न करत होते, पण आम्ही हे बदललं. आम्ही महत्त्वाकांक्षी विकासावर लक्ष केंद्रित केलं.”

आरएसएस आणि जीवनप्रवासाबाबत चर्चा
या मुलाखतीत मोदींनी त्यांच्या जीवनप्रवासाबाबत, आरएसएसमध्ये सामील होण्याबाबत, तसेच संघाच्या विचारधारेचा त्यांच्या जीवनावर झालेल्या प्रभावाबद्दलही सविस्तर चर्चा केली. या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी त्यांच्या राजकीय प्रवासातील संघर्ष, देशातील बदलती परिस्थिती, आणि भविष्यातील दृष्टीकोन याबद्दलही सखोल संवाद साधला.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *