पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं नातं अनेक दशकांपासून दृढ आहे. संपूर्णवेळ प्रचारक म्हणून त्यांनी संघात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. मात्र, पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतरच्या ११ वर्षांत त्यांनी संघाच्या स्मृती मंदिराला कधीच भेट दिली नव्हती. गुढीपाडव्याच्या दिवशी, ३० मार्च रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत नागपूरमध्ये एका कार्यक्रमासाठी व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. त्याआधी मोदी हे रेशीमबाग येथील संघाच्या स्मृती मंदिरात जाऊन डॉ. हेडगेवार यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेणार आहेत. संघासाठी ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यावेळी संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी पंतप्रधान मोदींचं स्वागत करणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान झाल्यानंतर स्मृती मंदिराला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरणार आहेत.
रेशीमबाग परिसरातील स्मृती मंदिर हे संघाच्या पहिल्या दोन सरसंघचालकांच्या समाधीस्थळांमुळे स्वयंसेवकांसाठी पवित्र स्थान मानलं जातं. येथे डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांची समाधी आहे. नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना येथे भेट दिली होती, मात्र पंतप्रधान झाल्यानंतर ते प्रथमच येथे येणार आहेत.
मोदी आणि भागवत यांची ही भेट केवळ संघाच्या मुख्यालयापुरती मर्यादित नसून, नागपुरातील माधव नेत्रालय आय इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटर नवीन इमारतीच्या भूमिपूजनासाठीही ते उपस्थित राहणार आहेत. हे नेत्रालय संघाशी संलग्न असून, नवीन इमारत हिंगना रोडवरील वासुदेवनगर मेट्रो स्टेशनजवळ उभारण्यात येणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी १० वाजता या प्रकल्पाच्या पायाभरणी समारंभाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहतील.
भाजप आणि संघाच्या संबंधांवर वारंवार चर्चा होत असताना, मोदी आणि भागवत हे ३० मार्च रोजी एकाच व्यासपीठावर येणार, याला विशेष महत्त्व दिलं जात आहे. यापूर्वी, राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या लोकार्पण सोहळ्यात त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र तो यशस्वी झाला नव्हता. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांना निमंत्रित करून भागवत-शहा यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्नही अपयशी ठरला. मात्र, या वेळी माधव नेत्रालयाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी मोदी आणि भागवत एकत्र येणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गोविंदगिरी महाराज, अवधेशानंद गिरी महाराज यांनाही निमंत्रित करण्यात आलं आहे.
Leave a Reply