डीपीएस फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी वन विभागाचा पुढाकार

नवी मुंबईतील नेरुळ येथील डीपीएस फ्लेमिंगो तलावाला संरक्षित राखीव क्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी राज्य वन विभागाने जनमत संकलन सुरू केले आहे. या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असून १,००० हून अधिक नागरिकांनी तलाव संवर्धनासाठी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला आहे. नेरुळमधील डीपीएस फ्लेमिंगो तलावात खाडीतून येणाऱ्या भरतीच्या पाण्याचा प्रवाह सिडकोच्या नेरुळ जेट्टीमुळे अडला, त्यामुळे तलाव कोरडा पडला आणि स्थलांतरित फ्लेमिंगो येणे थांबले. यामुळे पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त करत सरकारकडे लक्ष देण्याची मागणी केली होती. ”कांदळवनासोबतच फ्लेमिंगोचा अधिवास नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असा आरोप करत पर्यावरण संघटनांनी याप्रकरणी आंदोलनही केले होते. राज्य सरकारने डीपीएस तलावातील नैसर्गिक जलप्रवाह कायम राहावा यासाठी वरिष्ठ तज्ज्ञ अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली होती. या समितीने कांदळवन विभागाला स्पष्ट निर्देश दिले की, तलावातील पाण्याचा प्रवाह कोणत्याही परिस्थितीत अडवला जाता कामा नये.

डीपीएस तलावात पुन्हा पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरू करण्यासाठी कांदळवन कक्षाने सिडकोकडे विनंती केली होती, मात्र दोन महिने उलटूनही कोणतीही कारवाई झाली नाही. परिणामी, तलावात शेवाळ साचून दुर्गंधी निर्माण झाली आणि फ्लेमिंगो पूर्णतः गायब झाले. गेल्या वर्षी डीपीएस तलाव परिसरात अनेक फ्लेमिंगो मृत अवस्थेत आढळल्याने सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली. वन सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने तलावाला संरक्षणाचा दर्जा द्यावा, अशी शिफारस केली. तसेच, सिडकोने त्वरित जलप्रवाह सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या.

वनमंत्री गणेश नाईक यांनी डीपीएस तलावातील भरतीचे पाणी अडवले गेल्याने पर्यावरणीय समतोल बिघडल्याचे लक्षात घेत, तातडीने जलप्रवाह सुरळीत करण्याचे आदेश दिले. मात्र, पाणी परतीचा मार्ग माती टाकून पुन्हा बंद करण्यात आल्याने पर्यावरण प्रेमींनी सिडकोवर नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या पर्यावरण प्रभाव अहवालात डीपीएस तलाव आणि इतर पाणथळ भागांचे संरक्षण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, सिडकोच्या अकार्यक्षमतेमुळे पाणथळ भाग दुष्परिणाम भोगत असल्याचा आरोप पर्यावरण संघटनांनी केला आहे.

जनतेच्या स्वाक्षरी मोहिमेला जोरदार प्रतिसाद मिळत असून, नागरिक मोठ्या प्रमाणात या मोहिमेत सहभागी होत आहेत. ”सेव्ह फ्लेमिंगो” आणि ”मॅन्ग्रोव्ह फोरम” च्या रेखा सांखल यांनी सांगितले की, ही मोहीम समाज माध्यमांद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *