अडीच हजार कोटी रुपये खर्चून आखण्यात आलेल्या समान पाणीपुरवठा योजनेतील ६५ पाण्याच्या टाक्यांपैकी फक्त २२ टाक्यांचा वापर सुरू आहे, तर उर्वरित ४३ टाक्यांना अद्याप जलवाहिन्या जोडल्याच नाहीत. विशेष म्हणजे, महापालिकेने जानेवारी महिन्यात माहिती अधिकारात दिलेल्या उत्तरात केवळ एका टाकीचा उपयोग सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु आता मात्र २२ टाक्यांचा वापर सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या उत्तरांमध्येच मोठा विरोधाभास दिसून येत आहे.
पुणेकरांना समान आणि उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने सुमारे अडीच हजार कोटींचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला होता. शहराची पुढील ३० वर्षांची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन हा प्रकल्प आखण्यात आला. या योजनेंतर्गत ८६ पाणी साठवण टाक्या, १२२४ किमी लांबीच्या जलवाहिन्या, २ लाख ३२ हजार २८८ पाणीमीटर, ७ नागरी सुविधा केंद्रे आणि ५ नवीन पंपिंग स्टेशन उभारण्याचे उद्दिष्ट होते. फेब्रुवारी २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याची योजना होती, मात्र विविध अडथळे आणि कोरोना महामारीमुळे या प्रकल्पाला चार वेळा मुदतवाढ देण्यात आली.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ६५ टाक्यांची कामे पूर्ण झाली असून, १० टाक्यांची कामे ५० टक्क्यांपर्यंत आणि ९ टाक्यांची कामे २० टक्क्यांच्या आसपास पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे दोन टाक्यांसाठी जागाच निश्चित झालेली नाही. मात्र, काम पूर्ण झालेल्या ६५ टाक्यांपैकी केवळ २२ टाक्यांचा पाणीपुरवठ्यासाठी उपयोग सुरू आहे, तर ४३ टाक्यांवर पाणी वाहिन्यांचे काम झालेले नाही. त्यामुळे या टाक्या निष्क्रिय अवस्थेत आहेत.
माहिती अधिकार कार्यकर्ते भरत जैन सुराणा यांनी समान पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाक्यांबाबत माहिती मागितली होती. महापालिकेने जानेवारी महिन्यात दिलेल्या उत्तरात केवळ कात्रज येथील सर्व्हे नं. १२७ मधील एका टाकीचा वापर सुरू असल्याचे सांगितले होते. मात्र, अवघ्या एका महिन्यातच महापालिकेने तोंडी दिलेल्या उत्तरात २२ टाक्यांचा वापर सुरू असल्याचे सांगितले, त्यामुळे या संख्यांमध्येच मोठी तफावत दिसून येत आहे.
- समान पाणीपुरवठा योजनेमुळे पुणेकरांना सुयोग्य आणि नियंत्रित पाणीपुरवठा मिळेल, असे गृहीत धरले जात होते. मात्र, चार वेळा मुदतवाढ देऊनही अजूनही अनेक भागांत पाणीपुरवठ्याच्या समस्या कायम आहेत. पाणीपुरवठा विभागातील एका अधिकाऱ्यानेही ही योजना कितपत प्रभावी आहे, याबद्दल शंका व्यक्त केली. “या योजनेचा नक्की फायदा किती आणि तोटा किती, हे आम्हालाच अजून कळत नाही. याबद्दल अधिक बोलणे कठीण आहे,” असे त्यांनी सांगितले. त्यामुळे ही योजना पुणेकरांसाठी वरदान ठरणार की केवळ ‘पांढरा हत्ती’ पोसण्याचा प्रयत्न आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
Leave a Reply