मुंबईतील आदिवासींचा उद्या आंदोलनाचा निर्धार

मुंबईतील नैसर्गिक जंगलांवर वेगाने वाढणाऱ्या सिमेंटच्या अतिक्रमणाला आळा घालावा, या मुख्य मागणीसाठी मुंबईतील मूळ निवासी आदिवासी बांधव विधानसभेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. २१) आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहेत. मुंबई शहराचा आत्मा म्हणजे येथील आदिवासी पाडे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे दुग्ध वसाहत, चित्रनगरी, गोराई गाव, मढ, आयलंड या भागांमध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. मुंबई शहराला गारवा आणि मुबलक ऑक्सिजन मिळवून देणाऱ्या जंगलांची जोपासना या समाजाने पिढ्यान्‌पिढ्या केली आहे. पूर्वी ठाणे जिल्ह्याचा भाग असलेल्या या मुंबई उपनगर जिल्ह्यात २२२ आदिवासी पाडे आहेत.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे दुग्ध वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे होत आहेत. एकीकडे वाढत्या झोपडपट्ट्यांमुळे जंगल कमी होत आहे, तर दुसरीकडे बिल्डर आणि विकसकांनीही नैसर्गिक जंगल पोखरले आहे. दिवसेंदिवस सिमेंटच्या जंगलांची वाढ होत असून आदिवासींनी याविरोधात आवाज उठवला आहे.

आदिवासी शहरात आले नाहीत, तर शहरच आदिवासींच्या दारात आले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्व तलाव आदिवासी क्षेत्रात असूनही, आम्हाला आमच्या हक्कांचा न्याय मिळत नाही,असे आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या कष्टकरी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल लाड यांनी सांगितले. सरकारला जागे करण्यासाठी हे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्य मागण्या

• महाराष्ट्राच्या राजधानीत आदिवासींची होणारी परवड थांबवावी.

• आदिवासी गावठाणांना अधिकृत मान्यता द्यावी.

• शेतजमिनीचे प्रश्न त्वरित सोडवावे.

• वनहक्क कायदा २००६ ची प्रभावी अंमलबजावणी करावी.

• आदिवासींना जातीचे दाखले मिळावेत.

• मूलभूत मानवी सुविधा प्रदान कराव्यात.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *