सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, यात विविध विधेयकांना मंजुरी मिळत आहे तसेच महत्त्वाच्या घोषणाही केल्या जात आहेत. अशाच एका महत्त्वाच्या निर्णयाचा भाग म्हणून मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथे ६,६९१ चौ. मीटर जागेवर राज्याचे नवीन ‘महापुराभिलेख भवन’ उभारले जाणार असल्याची घोषणा शुक्रवारी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत असलेल्या पुराभिलेख संचालनालयाची स्थापना १८२१ मध्ये करण्यात आली. याआधी, दोन दिवसांपूर्वीच मंत्री शेलार यांनी बीकेसी येथे स्वतंत्र वस्तूसंग्रहालय आणि कला भवन उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर, आता ‘महापुराभिलेख भवन’ उभारण्याच्या निर्णयामुळे राज्याच्या ऐतिहासिक दस्तऐवजांचे जतन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. सध्या पुराभिलेख संचालनालयाकडे १७.५ कोटी कागदपत्रांपैकी १०.५ कोटी कागदपत्रे मुंबईतील मुख्यालयात आहेत, अशी माहिती मंत्री शेलार यांनी दिली.
सध्या १८८९ पासून पुराभिलेख मुख्यालय हे एल्फिन्स्टन कॉलेजच्या ‘सर कावसजी रेडिमनी’ इमारतीत कार्यरत आहे. येथे दुर्मीळ ऐतिहासिक कागदपत्रांचे जतन केले जाते. मात्र, जागेच्या अभावामुळे अद्ययावत पद्धतीने दस्तऐवजांचे संरक्षण करणे शक्य होत नाही. त्यामुळेच नवीन ‘महापुराभिलेख भवन’ उभारण्याचा निर्णय घेतला असून, हे भवन अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल.
या इमारतीत तापमान व आर्द्रता नियंत्रित अभिलेख कक्ष, स्वतंत्र बांधणी शाखा, प्रतिचित्रण विभाग, तसेच देश-विदेशातील इतिहास संशोधकांसाठी स्वतंत्र संशोधन कक्ष आणि प्रदर्शन दालन उपलब्ध असेल. या नव्या सुविधांमुळे ऐतिहासिक दस्तऐवजांचे जतन व संवर्धन अधिक प्रभावीपणे करता येणार असून, हे भवन राज्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, असे मंत्री आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.
Leave a Reply