२०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या व्यापक तयारीच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर हे प्राधिकरण स्थापन करण्यासाठी लवकरच नवीन कायदा आणला जाणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी नाशिक दौऱ्यात कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेताना सांगितले की, “कुंभमेळ्याशी संबंधित विविध प्रकल्पांना कायदेशीर चौकट मिळावी आणि गर्दी व्यवस्थापन अधिक प्रभावी व्हावे यासाठी आम्ही स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करू.”
भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने विशेष योजना आखली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित विकास प्रकल्पांचा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी प्रथम टप्प्यातील कामे वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच, या प्रकल्पांसाठी राज्य सरकार आवश्यक निधी उपलब्ध करून देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कुंभमेळ्याच्या तयारीसाठी शासकीय विश्रामगृहात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत त्र्यंबकेश्वर विकास आराखड्यावर सखोल चर्चा झाली.
बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी त्र्यंबकेश्वर परिसराच्या नैसर्गिक सौंदर्याचे जतन करणे महत्त्वाचे असल्याचे सांगत प्रशासनाने तयार केलेल्या विकास आराखड्याची तातडीने अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन दिले.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, “या योजनेसाठी मुख्यमंत्री अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन केली जाईल आणि तिच्या माध्यमातून सर्व विकासकामांना मंजुरी दिली जाईल. याअंतर्गत नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारली जाईल.”
कुंभमेळ्यादरम्यान स्थानिक नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जाईल. इलेक्ट्रिक वाहनांचा अधिकाधिक वापर, प्रभावी घनकचरा व्यवस्थापन, आधुनिक स्वच्छता सुविधा आणि गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या.
बैठकीत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी ₹१,१०० कोटी खर्चाच्या त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याची सविस्तर माहिती दिली. या आराखड्यात आध्यात्मिक आणि पर्यटन महत्त्व लक्षात घेऊन विविध विकास उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या नियोजनानुसार २०२७ सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची सर्व विकासकामे निश्चित वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.
Leave a Reply