कंत्राटी पद्धतीने कामगार पुरविणाऱ्या कंपनीच्या मालकाच्या वडीलांचे अपहरण करून त्यांच्याकडून १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या सहा जणांना आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींमध्ये मनसे कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्याचा समावेश असून, संघटनेच्या चिटणीसासह अन्य पाच जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे.
विजय मोरे हे विविध ठिकाणी कंत्राटी पद्धतीने कामगार पुरविण्याचा व्यवसाय करतात. फोर्ट येथे बँक ऑफ इंडिया जवळ त्यांचे कार्यालय आहे. सोमवारी त्यांच्या कंपनीतील १७ कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद केले. त्यात दोन मनसे कार्यकर्त्यांचाही समावेश होता. काम बंद होताच काही कार्यकर्ते मोरे यांच्या कार्यालयात घुसले. पर्यवेक्षक सुजित सरोज (३६) याला शिवीगाळ व मारहाण करत धमकी दिली. मात्र, इतक्यावरच न थांबता, या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी मोरे यांचे वडील पांडुरंग मोरे यांना जबरदस्तीने गाडीत टाकले व त्यांना मनसेच्या दादर येथील युनियन कार्यालयात घेऊन जात असल्याचे सांगून पळ काढला. यानंतर आरोपींनी विजय मोरे यांना फोन करून वडिलांना सुखरूप परत हवा असेल, तर १० लाख रुपये द्या अशी मागणी केली. या घटनेनंतर मोरे यांनी तात्काळ आझाद मैदान पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
पोलीस पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत संघटनेचा चिटणीस सुजय ठोंबरे (३०), सुनील राणे (५६), अरुण बोरले (५२), अरुण शिर्के (२९), रोहित जाधव (२४) आणि मनोहर चव्हाण (३९) यांना अटक केली. विशेष म्हणजे, सुजय ठोंबरे याच्याविरोधात याआधीच साकीनाका आणि कुर्ला पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. तसेच, पांडुरंग मोरे यांचे अपहरण करण्यासाठी वापरलेली महिंद्रा थार पोलिसांनी जप्त केली आहे.
Leave a Reply