जीवनातील अडचणींवर तोडगा शोधण्याच्या प्रयत्नात मुंबईतील एका तंत्रज्ञाला ऑनलाइन ज्योतिषाच्या माध्यमातून प्रचंड आर्थिक फटका बसला. भवितव्य सुधारण्याच्या नादात त्याने सुनियोजित फसवणुकीच्या जाळ्यात पाऊल टाकले आणि तब्बल १२.२० लाख रुपये गमावले.
बीकेसी येथे राहणाऱ्या या तंत्रज्ञाने ‘डेव्हाईनटॉक’ नावाचे एक ऑनलाइन ज्योतिष ॲप डाउनलोड केले. जानेवारी महिन्यात त्याची ओळख निशांत नावाच्या स्वयंघोषित आध्यात्मिक मार्गदर्शकाशी झाली. ६,३०० रुपयांत एक विशेष विधी करून जीवनातील अडथळे दूर होतील, असे आश्वासन त्याला देण्यात आले.
सुरुवातीला विचार करूनही, काही दिवसांनी तंत्रज्ञाने हा विधी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ‘बडे महाराज’ नावाच्या कथित संताशी त्याची ओळख करून देण्यात आली.
बडे महाराजांनी १५,३०० रुपयांची मागणी केली, त्यानंतर २८,००० रुपये अजून घेतले. तंत्रज्ञाने विश्वास ठेवून पैसे पाठवले. मात्र, काही दिवसांनी विधी अपूर्ण असल्याचे सांगून त्याच्याकडून २०,००० रुपये अधिक मागण्यात आले.
धमक्यांनी घाबरलेल्या तंत्रज्ञाने २.४१ लाख रुपये भरले, पण त्याच्या मनातील शंका गडद होत गेली. त्यानंतरही त्याच्याकडून सतत पैसे उकळण्यात येत राहिले.
तणाव आणि भीती वाढल्यामुळे तंत्रज्ञाने क्रेडिट कार्डवर कर्ज घेतले, खाजगी कर्जदारांकडून पैसे उधार घेतले आणि एकामागून एक व्यवहार करत राहिला. अवघ्या सहा दिवसांत त्याने १२.२० लाख रुपये गमावले.
शेवटी, मित्रांच्या सल्ल्याने त्याने ‘डेव्हाईनटॉक’च्या ग्राहक सेवेशी संपर्क साधला. तिथे त्याला फसवणूक झाल्याची जाणीव झाली. ऑनलाईन पुनरावलोकने पाहिल्यानंतर त्याला समजले की, त्याच्यासारखे अनेक लोक या जाळ्यात अडकले आहेत. सोमवारी, तंत्रज्ञाने सायबर पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली. पोलिसांनी बीएनएस आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ऑनलाईन ज्योतिष आणि अध्यात्माच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीचा धोका अधोरेखित करते. त्यामुळे अशा भूलथापांना बळी न पडता सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे.


Leave a Reply