मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. अण्णांची बिनविरोध निवड होताच दोन्ही बाजूच्या नेत्यांनी त्यांना सन्मानाने खुर्चीत बसवले. असं असलं तरी विरोधी पक्षनेता पद यावेळी रिक्तचं राहिलं. त्यासाठी पावसाळी अधिवेशनापर्यंत वाट पाहावी लागणार. दरम्यान अण्णा बनसोडे यांची निवड होताच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी त्यांचं अभिनंदन केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उपाध्यक्ष म्हणून बनसोडे हे सत्तारुढ आणि विरोधी पक्षालाही न्याय देतील,हा माझा विश्वास आहे. या सभागृहाला उपाध्यक्षांचीही एक मोठी परंपरा राहिली आहे. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष असे करत आज बनसोडे हे उपाध्यक्ष झाले आहेत. सर्वांना घेऊन चालणारा नेता ही प्रतिमा ते उपाध्यक्ष म्हणून ही जपतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बनसोडे हे अजितदादांची सावली आहेत. आपल्या सावलीचाही भरवसा राहिला नाही, असा आजचा काळ असताना बनसोडे हे निष्ठेने त्यांच्यासोबत आहेत. उपाध्यक्ष म्हणून ते उत्कृष्ट काम करतील, असा विश्वास व्यक्त करत शिंदे यांनी’पुरी हो गई दादा की तमन्ना, उपाध्यक्षपद पर बैठ गए अण्णा’ अशी मिश्किल कोटी केली.
यादरम्यान अण्णा बनसोडे यांना 2019 साली उमेदवारी यादीतून वगळल्यानंतर आपण कसे रात्रीच्या 2 वाजता मुंबई-पुणे हाय व्हेवर त्यांना एबी फॉर्म दिला होता आणि ते कसे 17 हजार मतांनी निवडून आले होते, याचा किस्सा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सांगितला. शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील, उद्धव सेनेचे भास्कर जाधव आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे विजय वडेट्टीवार यांनी देखील अण्णा बनसोडे यांना उपाध्यक्षपदी विराजमान झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
अण्णा बनसोडे यांची राजकीय कारकीर्द
पिंपरी चिंचवड या राखीव असलेल्या मतदारसंघाचे अण्णा बनसोडे हे आमदार आहेत. २०१४ मध्ये झालेला पराभव वगळता ते तीन वेळा निवडून आले आहेत.अण्णा बनसोडे यांचा राजकीय प्रवास महापालिकेच्या निवडणुकीपासून सुरू झाला. राजकारणात येण्यापूर्वी ते पान टपरी चालवायचे. हा व्यवसाय करत असताना ते राजकारणात सक्रीय झाले आणि १९९७ मध्ये त्यांनी पहिल्यांदा महापालिकेची निवडणूक लढवली आणि नगरसेवक बनले. २००२ मध्ये पुन्हा ते नगरसेवक बनले. याच काळात त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले.
याच काळात ते अजित पवारांच्या संपर्कात आले आणि आता ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. ज्या ठिकाणी त्यांची पूर्वी पान टपरी होती, त्याच जागेवर आता त्यांचं जनसंपर्क कार्यालय आहे. २००९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिंकले. मात्र, २०१४ मध्ये त्यांचा पराभव झाला. मात्र परत २०१९ आणि २०२४ साली ते निवडून आले. २०२४ मध्ये महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर अण्णा बनसोडे यांना मंत्रिपदासाठी इच्छुक होते. पण, त्यांना संधी मिळाली नाही, त्यामुळे नाराज झाले होते. आता विधानसभा उपाध्यक्षपदासाठी दोन-तीन नावे स्पर्धेत होती. अखेर अण्णा बनसोडे हे उपाध्यक्ष बनले आहेत.
Leave a Reply