प्रवाशांच्या सेवेसाठी धावणाऱ्या एसटी महामंडळाने प्रवाशांच्या तक्रारी मात्र केराच्या टोपलीत फेकल्या आहेत. एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत एसटीकडे तब्बल १४,१८० तक्रारी दाखल झाल्या, मात्र त्यातील फक्त ५१३ प्रकरणांवरच कार्यवाही करण्यात आली आहे; म्हणजे केवळ ३ टक्के तक्रारींची सोडवणूक. राज्यात रोज एसटीच्या १४ हजारांहून अधिक बसमधून सुमारे ४५ ते ४८ लाख प्रवासी प्रवास करतात. योजनांच्या घोषणांमुळे प्रवासी वाढले तरी, त्यांच्या अडचणींवर उत्तर देणारे व्यवस्थापन मात्र कोलमडले आहे. प्रवाशांनी टोल फ्री क्रमांक, ई-मेल, किंवा वेबसाइटवरून तक्रारी केल्या तरी त्या फाईलमध्येच दडपल्या जात आहेत.
तक्रारींची यादी मोठी, उपायांचा ठावठिकाणा नाही
बसस्थानकांतील अस्वच्छ शौचालये, वेळापत्रकाचा अभाव, बस न थांबणं, रद्द झालेल्या आरक्षणाचे पैसे परत न मिळणं, ब्रेकडाऊन, चालक-वाहकांची असभ्य वागणूक — अशा असंख्य तक्रारी नोंदवल्या गेल्या. मात्र, अधिकऱ्यांचा संपर्क क्रमांक प्रसिद्ध करुनही तक्रारींची दखल घेतली जात नाही.
‘प्रवासी राजा दिन’ फक्त कागदावर
एसटीची गुणवत्ता सुधारण्यासाठी महामंडळाने १५ जुलै २०२४ पासून ‘प्रवासी राजा दिन’ उपक्रम सुरू केला. यामध्ये प्रवासी, प्रवासी संघटनांना समस्या, तक्रारी, सूचना लेखी स्वरुपात सोमवारी आणि शुक्रवारी संबंधित आगारात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत मांडता येतात. मात्र, बहुतांश आगारांत हा उपक्रम सुरूच करण्यात आलेला नाही. त्यामुळे ‘प्रवासी राजा दिन’ कागदावरच राहिला आहे.
मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहिरात धोरणात आमूलाग्र बदल सुचवला. “सध्याच्या जाहिरात संस्थांकडून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही, त्यामुळे त्यांच्या करारांची पुनर्रचना करा आणि महामंडळाचं उत्पन्न १०० कोटींपर्यंत वाढवा, असा निर्देश त्यांनी दिला. सध्या जाहिरातीतून केवळ २२-२४ कोटींचंच उत्पन्न होते.
महामंडळाकडे आलेल्या तक्रारींची स्थिती (कालावधी : एप्रिल २०२४ ते मार्च २०२५)
• एकूण तक्रारी: १४,१८०
• आपले सरकार पोर्टलवरील: १५९
• सोडवलेल्या तक्रारी: ५१३
• संबंधित विभागाला पाठवलेल्या तक्रारी: १,२३१
• अद्याप प्रलंबित: १२,४१२
प्रशासनाला इशारा:
प्रवाशांच्या अडचणींवर तात्काळ उपाययोजना करा; असा आदेश परिवहन मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. पण हा आदेशही इतर तक्रारींसारखाच फाईलमध्ये गडप होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
तुमच्या तक्रारी मांडण्यासाठी:
• संकेतस्थळ: https://msrtc.maharashtra.gov.in
• टोल फ्री क्रमांक: १८००-२२१-२५०
• ई-मेल: gmtraffic@msrtc.gov.in
Leave a Reply