राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आधीच सरकारी कोट्यांतील फ्लॅट घोटाळ्यामुळे अडचणीत आलेले कोकाटे यांचे नाशिक दौऱ्यातील एक विधान सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
“कर्जमाफी मिळाल्यावर शेतकरी काय करतात?”
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर कोकाटे नाशिक दौऱ्यावर गेले असताना, कर्जमाफीसंदर्भात प्रश्न विचारणाऱ्या एका शेतकऱ्याला उत्तर देताना त्यांनी असे म्हटले की, कर्जमाफी मिळाली की लोक शेतीत गुंतवणूक करतात का? की साखरपुडे आणि लग्नात खर्च करतात?” या विधानाने सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उसळल्या असून, संकटात असलेल्या शेतकऱ्यांना दोष देणं कितपत योग्य आहे, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.
“भंपक, भामटा आणि बिनडोक कृषिमंत्री!” — राजू शेट्टींचा घणाघात
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोकाटेंवर जहाल टीका करत म्हटलं, महाराष्ट्राला भंपक, भामटा आणि बिनडोक कृषीमंत्री लाभला आहे. हे मंत्री शेतकऱ्यांची थट्टा करत आहेत. कधी त्यांची तुलना भिकाऱ्यांशी करतात, कधी त्यांना उपदेश करतात; त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करत, अशा असंवेदनशील मंत्र्यांना मंत्रिमंडळातून तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे.
मंत्र्यांना कोण शिस्त लावणार? सुषमा अंधारे यांचा सवाल
शिवसेना (उबाठा) नेत्या सुषमा अंधारे यांनीही कोकाटे यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करत म्हटलं, “उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यकर्त्यांना शिस्त लावण्याची भाषा करतात, पण मंत्र्यांचे काय? शेतकऱ्यांचा सतत अपमान करणाऱ्या मंत्र्यांना कोणी शिस्त लावणार?” असा ठाम सवाल करत त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं.
Leave a Reply