वक्फ (दुरुस्ती) कायदा, २०२५ लागू झाल्यानंतर आता भाजप इतर धर्मांच्या धार्मिक स्थळांच्या जमिनीवरही डोळा ठेवून आहे, असा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. रविवारी ‘शिवसंचार सेना’ या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आयटी व कम्युनिकेशन विभागाच्या उद्घाटनप्रसंगी ठाकरे बोलत होते. त्यांनी भाजपवर टीका करताना म्हटले, “वक्फ कायद्यानंतर आता ख्रिश्चन, जैन, बौद्ध आणि हिंदू मंदिरांच्या जमिनींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपला कोणत्याही धर्माची आस्था नाही; त्यांच्या उद्योगपती मित्रांसाठी उच्च दर्जाच्या जागा मिळवून देणे हेच त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे.”
ठाकरे यांनी यावेळी ‘ऑर्गनायझर’ या मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका लेखाचा उल्लेख करत सांगितले की, “या विषयाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. हे सत्य आता समोर येत असून प्रत्येकाने सजग राहिले पाहिजे.” पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, वक्फ (दुरुस्ती) विधेयक २०२५ ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी मिळालेली आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, या कायद्यामुळे मुस्लिम धार्मिक निधीच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणि सुधारणा होईल. मात्र, ठाकरे यांनी या विधेयकामागील राजकीय हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणी न्यायालयीन लढाईचा विचार आहे का, असा प्रश्न विचारल्यावर ठाकरे म्हणाले की, “आत्तापर्यंत पक्षाने कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.”
ठाकरे यांच्या पक्षातील खासदार संजय राऊत यांनी यापूर्वीही आरोप केला होता की, “वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनी भविष्यात भाजपच्या उद्योजक मित्रांना हस्तांतरित केल्या जातील.” त्यांनी भाजपवर निवडणुकांमध्ये अमाप खर्च केल्याचा आरोप करत म्हटले की, “गेल्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी जेवढा पैसा खर्च केला, तो महाराष्ट्राच्या पूर्ण अर्थसंकल्पाच्या जवळपास होता.” भाजपला भगवान रामांचे आदर्श आचरणात आणण्याचा सल्ला देत उद्धव ठाकरे म्हणाले, “राम मंदिर उभारणे पुरेसे नाही. राम हे आदर्श होते; त्यांच्या आचरणानुसार वागणं हेच खरे हिंदुत्व आहे.”
Leave a Reply