मुंबईतल्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मॅन्ग्रोव्ह मधील सुमारे ९,००० झाडांची कत्तल केली जाणार असून, आणखी ५१,००० झाडांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या या प्रकल्पामुळे मुंबईच्या पर्यावरणावर मोठा परिणाम होणार आहे. हा प्रस्तावित रस्ता वर्सोवा (पश्चिम उपनगर) पासून सुरू होऊन तो थेट विस्तारित शहर भायंदरपर्यंत पोहोचणार आहे. या प्रकल्पासाठी R/सेंट्रल वॉर्ड कार्यालयाने नागरिकांना २१ एप्रिलपर्यंत सूचना आणि हरकती दाखल करण्याचे आवाहन केले आहे. पर्यावरण मंत्रालयाकडून मंजुरी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच मिळाली होती. महाराष्ट्र कोस्टल झोनल मॅनेजमेंट अथॉरिटी , महापालिका आणि राज्य पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत नोंदवण्यात आले की, एकूण ६०,००० झाडांवर परिणाम होणार आहे.
मुंबईसारख्या किनारी शहरासाठी मॅन्ग्रोव्ह जंगलं ही नैसर्गिक कवचासारखी असतात. ती समुद्राची धक्कादायक लाटं, पूर, किनाऱ्यांची धूप यांपासून संरक्षण करतात. याशिवाय, त्यांच्या खोल मुळांमुळे गाळ साचतो आणि किनाऱ्याची मजबूती राखली जाते. मात्र, अतिक्रमण आणि वाढत्या विकास प्रकल्पांमुळे गेल्या काही दशकांत मॅन्ग्रोव्हच्या प्रमाणात घट झाली आहे.
महाराष्ट्र कोस्टल झोनल मॅनेजमेंट अथॉरिटी बैठकीच्या इतिवृत्तात नमूद करण्यात आलंय की, १०२ हेक्टर वनजमिनीच्या वापरासाठी मंजुरी मागवण्यात आली असून, त्यापैकी मॅन्ग्रोव्ह झाडांची संख्या तुलनेत कमी आहे. मात्र, ९,००० झाडं कापली जाणार असून उर्वरित झाडांवर परिणाम होणार आहे.
या प्रकल्पाचा दुसरा टप्पा सहा वेगवेगळ्या पॅकेजमध्ये विभागण्यात आला आहे
• पॅकेज A: वर्सोवा ते बांगुर नगर (गोरगाव) – ४.५ किमी
• पॅकेज B : बांगुर नगर ते माइंडस्पेस (मालाड) – १.६६ किमी
• पॅकेज C आणि D मध्ये दोन महाकाय सुरंग समाविष्ट असतील – ३.९ किलोमीटर लांबीचे – जे मालाड येथील माईंडस्पेसला कांदिवलीतील चारकोपशी जोडतील.
• पॅकेज E : चारकोप ते गोराई – ३.७८ किमी
• पॅकेज F : गोराई ते दहिसर – ३.६९ किमी
हा दुसरा टप्पा सुमारे २५ किमी लांब आणि २०,००० कोटी रुपये खर्चाचा असून, यात भूमिगत बोगदे, केबल-स्टे ब्रिज आणि वेगवेगळे वाहन इंटरचेंज असणार आहेत. रस्त्याचा आराखडा असा बनवण्यात आला आहे की, तो मॅन्ग्रोव्ह क्षेत्र, खाड्या आणि जंगलातून जाणार आहे. त्यामुळे, निसर्गाचा मोठा हिस्सा या प्रकल्पात गमावला जाण्याची शक्यता आहे.
Leave a Reply