आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मॅग्नम आईस्क्रीम कंपनीने भारतात आपले पहिले जागतिक क्षमता केंद्र (Global Capability Centre – GCC) स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी पुणे शहराची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमात सुमारे ₹९०० कोटींची गुंतवणूक होणार असून, ५०० पेक्षा जास्त रोजगार संधी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेदरलँड्समधील मुख्यालय असलेल्या युनिलिव्हर या बहुराष्ट्रीय कंपनीने आपल्या आईस्क्रीम व्यवसायाला स्वतंत्र कंपनी म्हणून कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला होता. नव्याने निर्माण झालेल्या या स्वतंत्र युनिटचे नाव ‘द मॅग्नम आईस्क्रीम कंपनी’ असे ठेवण्यात आले आहे. पुण्यात उभारल्या जाणाऱ्या जागतिक क्षमता केंद्रातून माहिती तंत्रज्ञान, पुरवठा साखळी, वित्त व्यवस्थापन, मानव संसाधन व अन्य सहाय्यक सेवा जागतिक स्तरावर पुरवल्या जातील. या प्रकल्पाची अधिकृत घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांनी यावेळी सांगितले की, “हे केंद्र राज्यातील युवकांसाठी उच्च पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध करून देणारे ठरेल.” यावेळी राज्य सरकार आणि मॅग्नम ऑन एक्स यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या समारंभास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मॅग्नम कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी अभिजित भट्टाचार्य देखील उपस्थित होते.
युनिलिव्हरने मार्च २०२३ मध्ये आपल्या आईस्क्रीम व्यवसायाला इतर युनिट्सपासून वेगळे काढण्याचा निर्णय घेतला होता. कारण या व्यवसायाचे कार्यपद्धती, रणनीती आणि बाजारातील स्थान वेगळ्या स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट झाले होते. युनिलिव्हरच्या आईस्क्रीम विभागात वॉल्स, मॅग्नम आणि बेन अँड जेरीसारखे जागतिक ब्रँड्स समाविष्ट आहेत. २०२३ मध्ये या ब्रँड्सने मिळून अंदाजे €७.९ अब्ज इतकी विक्री केली होती. याच पार्श्वभूमीवर युनिलिव्हरने आपल्या नवीन स्वतंत्र कंपनीस ‘द मॅग्नम आईस्क्रीम कंपनी’ असे नाव जाहीर केले आहे. भारतातील युनिलिव्हरचे उपकंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) ने सुद्धा आपल्या क्वालिटी वॉल्स व्यवसायाला स्वतंत्र कंपनीत रूपांतरित करण्याची योजना आखली आहे. ही नवीन कंपनी ‘क्वालिटी वॉल्स (इंडिया) लिमिटेड’ या नावाने स्वतंत्ररित्या सूचीबद्ध होणार आहे.
सध्या युनिलिव्हरची संशोधन व विकास केंद्रे बेंगळुरू आणि मुंबई येथे कार्यरत आहेत. ही केंद्रे कंपनीसाठी नाविन्यपूर्ण उत्पादने व प्रक्रिया विकसित करण्याचे काम करत आहेत. आता पुण्यात स्थापन होणारे हे नवीन जागतिक क्षमता केंद्र युनिलिव्हरच्या जागतिक व्यवसाय साखळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Leave a Reply