भाजपकडून माजी आमदार ज्ञानदेव आहुजा निलंबित,’दलित विरोधी मानसिकता’ काँग्रेसचा आरोप

अलवर येथील राममंदिरात काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते टीकाराम जूली यांच्या भेटीनंतर ‘गंगाजल’ टाकून शुद्धीकरण केल्याच्या प्रकारावरून भाजपने माजी आमदार ज्ञानदेव आहुजा यांना पक्षातून निलंबित केले आहे. या घटनेनंतर काँग्रेसने भाजपवर ‘दलितविरोधी मानसिकतेचा’ आरोप करत, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून माफीनाम्याची मागणी केली. जूली हे अनुसूचित जातीतील असून, मंदिरात त्यांच्या उपस्थितीनंतर आहुजा यांनी गंगाजल टाकून मंदिर शुद्ध केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. भाजपचे राज्य सरचिटणीस दमोधर अग्रवाल यांनी आहूजांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून तीन दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

भाजपच्या आदेशात म्हटले आहे की, “पक्षाध्यक्षांच्या निर्देशानुसार, तुम्हाला भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वावरून तत्काळ निलंबित करण्यात येत आहे. तसेच, तुमच्यावर झालेल्या आरोपांवर काही स्पष्टिकरण द्यायचे असल्यास तीन दिवसांच्या आत ते द्यावे, अन्यथा पुढील शिस्तभंग कारवाई करण्यात येईल, असेही पत्रात नमूद आहे.

पक्षाची प्रतिमा मलीन झाल्याचे स्पष्ट करत, भाजपने आहूजांच्या कृतीला ‘गंभीर अनुशासनभंग’ असे संबोधले आहे.

या प्रकरणावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंगळवारी जिल्हा मुख्यालयावर तीव्र आंदोलन करत आहुजांचा पुतळा जाळून निषेध नोंदवला. त्यांनी भाजपवर पुन्हा एकदा दलितविरोधी विचारसरणीचा आरोप केला. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले, २१व्या शतकात असा संकुचितपणा हा सभ्य समाजात कधीही स्वीकारार्ह नाही. टीकाराम जूली मंदिरात गेले म्हणून गंगाजल शिंपडणे, ही भाजपची दलितांविषयी असलेली घृणा दर्शवते. या प्रकाराचा तीव्र निषेध करतो.

दरम्यान, ज्ञानदेव आहुजांनी मात्र आपले कृत्य जातीयतेशी संबंधित नसल्याचा दावा करत काँग्रेसवर पलटवार केला. ज्यांनी प्रभू श्रीरामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, अयोध्येच्या राममंदिराच्या उद्घाटनाचा बहिष्कार केला, त्यांना अशा धार्मिक कार्यक्रमांना हजेरी लावण्याचा नैतिक अधिकारच नाही, असे आहुजा म्हणाले.

टीकाराम जुल्ली हे अलवर (ग्रामीण) येथील काँग्रेसचे आमदार असून, आहुजा हे रामगढ मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार आहेत.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *