मुंबईतील वांद्रे आणि वरळी या महत्त्वाच्या भागांचा पुनर्विकास करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्याने या परिसरातील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांना नवे बळ मिळाले आहे. राज्य मंत्रिमंडळाने म्हाडाच्या अखत्यारीतील २.६५ लाख चौरस मीटरहून अधिक क्षेत्रफळाच्या इमारतींच्या पुनर्विकासास मान्यता दिली आहे. या निर्णयाअंतर्गत वांद्रेतील १,९७,४६६ चौ. मी. क्षेत्रफळ आणि वरळीतील ६८,०३४ चौ. मी. क्षेत्रफळ असलेल्या ‘आदर्श नगर’ परिसरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या एकत्रित पुनर्विकासासाठी म्हाडामार्फत बांधकाम व विकास एजन्सीची नियुक्ती केली जाणार आहे. या पुनर्विकास प्रकल्पासाठी चार एफएसआय (Floor Space Index) मंजूर करण्यात येणार असून, त्यातील एक एफएसआय म्हाडाच्या घरसाठ्यासाठी राखीव ठेवण्यात येईल.
पुनर्विकासासाठी नेमण्यात येणाऱ्या विकासकाकडून, इच्छुक गृहनिर्माण संस्थांपैकी किमान ५१ टक्के सदस्यांची लेखी संमती म्हाडाकडे सादर करणे आवश्यक आहे. याशिवाय, मूळ रहिवाशांचे पुनर्वसन, तात्पुरती निवासव्यवस्था, दरमहा भाडे देणे, कॉर्पस निधी उपलब्ध करून देणे आणि आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करणे यासाठी देखील बांधकाम व विकास एजन्सी जबाबदार राहील. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारने १९७१ च्या ‘महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा, मंजुरी व पुनर्वसन) कायदा’त तीन महत्त्वाच्या सुधारणा करण्यासही मंजुरी दिली आहे.
या सुधारणा पुढीलप्रमाणे आहेत:
• झोपडपट्टी क्षेत्र जाहीर झाल्यानंतर मालक, विकासक अथवा सहकारी संस्थेला पूर्वी १२० दिवसांत पुनर्विकास प्रस्ताव सादर करणे बंधनकारक होते, आता हा कालावधी ६० दिवसांवर आणण्यात आला आहे. यानंतरही प्रस्ताव न सादर झाल्यास प्रकल्प इतर प्राधिकरणाकडे वर्ग केला जाईल.
• जर झोपडपट्टी पुनर्वसन योजना शासकीय, निमशासकीय संस्था किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांशी संयुक्त भागीदारीत राबवली जात असेल, तर बँकांकडून उद्देशपत्र (Letter of Intent) मिळाल्यानंतर ३० दिवसांत पुनर्विकासासाठी लागणारी जमीन ३० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्यात येईल.
• संक्रमण शिबिरांऐवजी झोपडपट्टी रहिवाशांना भाडे दिले जाते, मात्र विकासक वेळेवर भाडे न दिल्यास थकबाकी वाढते. त्यामुळे कायद्यात नवीन कलम ३३-ब समाविष्ट करण्यात येणार आहे, ज्याद्वारे ही थकबाकी महसूल कायद्यानुसार वसूल करता येणार आहे.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास प्रक्रियेला आवश्यक गती मिळणार असून, म्हाडाच्या घरसाठ्यात नव्या घरे समाविष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Leave a Reply