मृत्यूच्या सावटाखाली रेल्वे प्रवास!ठाणे ते कसारा आणि बदलापूर मार्ग ठरताय ‘प्राणघातक’ १५ महिन्यांत ६६३ बळी

ठाणे ते बदलापूर आणि कसारा दरम्यानचा मध्य रेल्वेचा मार्ग प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळाच ठरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.मागील १५ महिन्यांत म्हणजेच १ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत ठाणे, डोंबिवली आणि कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल ६६३ जणांना रेल्वे अपघातांमध्ये आपले प्राण गमवावे लागले आहेत.या मृत्यूंचे दोन मुख्य कारणे पुढे आली आहेत रेल्वे रुळ ओलांडताना घडणारे अपघात (३९१ मृत्यू) आणि धावत्या रेल्वेतून पडणे (२७२ मृत्यू). मुंबईच्या दिशेने रोजच्या रोज धावणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी हा मार्ग जीवनरेखा असला तरी, तीच आता त्यांच्यासाठी जीवघेणी ठरत आहे. रस्ते वाहतूक सेवा कमी असल्यामुळे लोक रेल्वेचा पर्याय निवडतात. मात्र, अनेक महत्त्वाचे रेल्वे प्रकल्प अद्याप प्रलंबित आहेत,आणि प्रवाशांकडूनही असावधपणे रुळ ओलांडण्याचे प्रकार घडतच आहेत.

ठाणे पोलीस हद्दीत येणाऱ्या ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, ऐरोली या स्टेशनमध्ये २०२४ मध्येच १५१ जणांचा रुळ ओलांडताना आणि ६८ जणांचा धावत्या गाडीतून पडून मृत्यू झाला. डोंबिवलीमध्ये ५४ आणि ३९, तर कल्याण विभागात १०४ आणि ११६ अशा आकड्यांनी मृत्यूचे प्रमाण नोंदवले गेले. २०२५ च्या पहिल्या तीन महिन्यांतही हे चित्र फारसे बदललेले दिसत नाही.

या अपघातांमध्ये पुरुष प्रवाशांचे प्रमाण सर्वाधिक आहे. २०२४ मध्ये ठाण्यात १४० पुरुष आणि ११ महिला, डोंबिवलीत ५१ पुरुष आणि ३ महिला, तर कल्याणमध्ये ९१ पुरुष आणि ३ महिलांचा मृत्यू झाला आहे.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले की, “प्रवाशांना वारंवार सूचना करूनही रुळ ओलांडण्याचे प्रकार थांबलेले नाहीत.यामुळे अनेकांना नाहक प्राण गमवावे लागत आहेत. मात्र, धावत्या गाड्यांतून पडण्याचे प्रमाण थोडकं का होईना, कमी झाले आहे.

रेल्वे रुळ ओलांडण्याचा धोका आणि धावत्या रेल्वेतील असावधता हे दोन्ही प्रवाशांचे प्राण घेऊ शकतात, हे वास्तव आहे. प्रवाशांनी स्वतःहून सावध राहणे आणि प्रशासनाने प्रलंबित प्रकल्पांवर वेळीच काम करणे, हेच या मृत्यूंची मालिका थांबवू शकते.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *