काँग्रेसला खरोखर मुस्लिमांबद्दल सहानुभूती वाटत असेल तर त्यांनी मुस्लीम पक्षाध्यक्ष नेमावा आणि निवडणुकांमध्ये ५० टक्के तिकिटे मुस्लिमांना द्यावी अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली. हरियाणाच्या हिसार येथे महाराज अग्रसेन विमानतळाच्या नवीन टर्मिनलचा शिलान्यास केल्यानंतर आणि हिसार ते अयोध्या व्यावसायिक विमानसेवेचे लोकार्पण केल्यानंतर जाहीर सभेत बोलताना वक्फच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांनी काँग्रेसवर शाब्दिक हल्ला चढवला.
काँग्रेसने मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचे धोरण राबवले, पण त्याचा कोणालाही फायदा झाला नाही,असा आरोप मोदींनी केला.उर्वरित मुस्लिम समाज मात्र दुर्लक्षित, निरक्षर आणि गरिबीच्या गर्तेत राहिला, असे ते म्हणाले.२०१३ साली काँग्रेस सरकारने वक्फ कायद्यात केलेल्या दुरुस्तींवरही त्यांनी निशाणा साधला. “२०१४च्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवूनच हे कायदे बदलले गेले,” असा आरोप त्यांनी केला.
धर्माच्या आधारावर आरक्षण असता कामा नये असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते, तसेच राज्यघटनेतही त्यावर बंदी आहे. मात्र कर्नाटकातील काँग्रेस सरकारने अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीयांचा अधिकार काढून घेऊन मुस्लिमांना आरक्षण दिले असा आरोप पंतप्रधानांनी केला.
देशातील १९७५ मधील आणीबाणीचा दाखला देत “त्यावेळी काँग्रेसने आंबेडकरांचं रचलेली राज्यघटना उद्ध्वस्त केलं,” असा घणाघातही त्यांनी केला. समान नागरी कायद्याबाबतही काँग्रेसने नेहमी मौन बाळगलं, त्याची अंमलबजावणी केली नाही, अशी टीका त्यांनी केली.काँग्रेसने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांना दुय्यम नागरिकांचा दर्जा दिला असा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
यमुनानगर येथील दीनबंधू छोटूराम औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या भूमिपूजनावेळी बोलताना मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या काळात सतत लोडशेडिंग असायचं. “२०१४पूर्वी देश अंधारात होता, आता मात्र वीज निर्यात करतो,” असा दावा त्यांनी केला. हा नवीन प्रकल्प ८०० मेगावॅट वीज निर्माण करणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
काँग्रेसने मुस्लीम अध्यक्ष नेमावा. ते तसे का नाही करत? मुस्लिमांना ५० टक्के तिकिटे द्यावीत. ते जिंकल्यावर त्यांची मते मांडतील. पण काँग्रेस असे काही करणार नाही. ते मुस्लिमांना काही देणार नाहीत पण इतर नागरिकांचे अधिकार हिरावून घेतील.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
Leave a Reply