दादर रेल्वे स्थानकाजवळील फेरीवाल्यांना हटवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं पोलिसांच्या मदतीनं संयुक्त मोहीम हाती घेतली खरी, पण प्रत्यक्षात तिचं यश अजूनही नजरेस पडत नाहीये. महापालिकेच्या कार्यालयीन वेळेनंतर, तसेच सुट्टीच्या दिवशी, स्टेशनच्या परिसरात फेरीवाल्यांची गर्दी पुन्हा जुन्याच जोमात पाहायला मिळते.महानगरपालिकेनं दादर पश्चिम रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्यासाठी कारवाई तीव्र केली असली, तरी वास्तव असं आहे की, फेरीवाल्यांचा अड्डा अजूनही तसाच कायम आहे. त्यामुळे परिसर ‘फेरीवाला मुक्त’ होण्याच्या चर्चा आता खुद्द फेरीवाल्यांच्याच गप्पांमध्ये उपहासाने ऐकू येत आहेत. “या जन्मात तरी पालिकेला आम्हाला हटवता येणार नाही,” असं त्यांच्या तोंडून खुलेआम बोललं जातं.
महापालिकेच्या आदेशानुसार मुंबईतील २० प्रमुख ठिकाणे फेरीवालामुक्त करण्याचा निर्णय घेतला असून, त्यात दादर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील १५० मीटर परिसराचाही समावेश आहे. मात्र, मोहिमेच्या पहिल्याच टप्प्यात हीच ठिकाणं पुन्हा फेरीवाल्यांनी व्यापलेली दिसतात.शनिवार-रविवारसह सुट्ट्यांमध्ये या परिसरात फेरीवाल्यांचा झपाट्याने ताबा दिसून येतो. त्यांच्या म्हणण्यानुसार, “महापालिकेची कारवाई फक्त ३-४ दिवसांची असते. मग आम्ही पुन्हा आमचं बस्तान बसवतो. इतक्या वेळा मोहिमा झाल्या, पण एकाही मोहिमेनं आम्हाला कायमचं थांबवलं नाही.”
फेरीवाल्यांच्या आंतरिक चर्चांमध्येही हे स्पष्ट होतंय “महापालिकेचे अधिकारी आपलं काम करतात, आम्ही आमचं. त्यांच्याकडे इतकी मॅनपॉवरच नाही की आम्हाला कायमचं थांबवू शकतील. आणि खरंतर त्यांनाही ते फारसं हवं नसतं. वरच्या अधिकाऱ्यांच्या दबावामुळे त्यांना कारवाई करावी लागते. आजवर अनेकदा मोहिमा आल्या आणि थोड्याच दिवसांत थांबल्या. त्यामुळे यंदाचीही मोहिम फार काळ टिकेल का, हा संशय फेरीवाल्यांतच नव्हे, तर स्थानिक नागरिकांतही व्यक्त होतोय.
दरम्यान, ही परिस्थिती पाहून उबाठा शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रीती पाटणकर यांनी देखील प्रथमच महापालिका आयुक्त व प्रशासकांना निवेदन देत दादरमधील फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. स्थानिक आमदार महेश सावंत यांचंही या मागणीला समर्थन आहे
Leave a Reply