ठाण्यात हिरवळीचा संहार? १,३०० झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा विकासकाचा ‘डाव

ठाणे शहरातील पायाभूत प्रकल्पांच्या झपाट्याने सुरू असलेल्या कामांमुळे आता हिरवाईवर घाला पडण्याची चिन्हं आहेत. एका विकसकाने तब्बल १,३०० झाडांची कत्तल करण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे सादर केला आहे. हा प्रस्ताव चार टप्प्यांत झाडांची तोड आणि पुनर्रोपण करण्याबाबत असून, त्यात झाडांच्या वयोमानाबाबत दाखवलेली माहिती संशयास्पद असल्याने तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
शहरातील घोडबंदर सेवा रस्त्यावर १,६४६ झाडे, कोस्टल रोड प्रकल्पासाठी ३०९ झाडे आणि बोरिवली भुयारी मार्गासाठी अनेक झाडांवर कुऱ्हाड चालवली जात आहे. या पार्श्वभूमीवर, आता माजिवडे येथील पोखरण रोड नं. २ परिसरातील भूखंड क्रमांक S04-0183-20 (प्लॉट बी), सेक्टर ४, फेज १, २ आणि ३ अंतर्गत १३०० झाडांवर कुऱ्हाड चालवण्याची मागणी विकसकाने केली आहे.
प्रस्तावानुसार,
• टप्पा १: २२४ झाडांची तोड, ३६१ पुनर्रोपण
• टप्पा २: १९२ झाडांची तोड, १०७ पुनर्रोपण
• टप्पा ३: १०२ झाडांची तोड, ४५ पुनर्रोपण
या प्रस्तावावर महापालिकेने हरकती मागवल्यानंतर वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य विक्रांत तावडे यांनी लेखी आक्षेप नोंदवत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सादर केलेल्या हरकतीत वन विभागाच्या तपासणीत झाडांचे वय, घेर, उंची यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळल्याचे नमूद केले आहे. डिसेंबर २०२३ मध्ये वन अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत एका वृक्षाचं (क्रमांक ७३ – मोहाचे झाड) वय १०० वर्षांहून अधिक असल्याचे निष्पन्न झाले. मात्र विकसकाने हे वय कमी दाखवले आहे.

काय आहेत मुख्य आक्षेप?
• एकाच प्रस्तावात एकदाच परवानगी देण्याचा नियम असतानाही विकसकाला चार टप्प्यांत परवानगी मागण्याची मुभा देण्यात आली.
• विकसकाने भूखंडावर असलेल्या सर्व झाडांची यादी दिली असली तरी ती महापालिकेच्या झाडगणनेशी जुळत नाही.
• झाडांच्या वयोमानात तफावत असून, जुनी आणि मोठी झाडं लपवण्याचा प्रकार समोर आला आहे.

या पार्श्वभूमीवर विक्रांत तावडे यांनी महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन देत, चौकशी पूर्ण होईपर्यंत वृक्षतोड व पुनर्रोपणास परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे.दरम्यान, या प्रस्तावास अद्याप महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून कोणतीही अधिकृत परवानगी देण्यात आलेली नाही, अशी माहिती उपायुक्त मधुकर बोडके यांनी दिली आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *