दक्षिण मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये गुरुवारी झालेल्या आयपीएल सामन्यादरम्यान एका वरिष्ठ न्यायाधीशाचा महागडा ‘आयफोन १४’ चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू असताना ही चोरी घडली. संबंधित न्यायाधीश हे दक्षिण मुंबईतील एका न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य न्यायदंडाधिकारी आपल्या पत्नी, मुलगा आणि काही नातेवाइकांसोबत सामना पाहण्यासाठी आले होते. स्टेडियमच्या गेट क्रमांक ४ जवळून प्रवेश करत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने त्यांचा मोबाईल फोन लंपास केला.
सामना सुरू असताना मोबाईल हरवल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ ऑनलाईन तक्रार दाखल केली, त्यानंतर मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात अधिकृतपणे चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी आयटी कायद्यासह संबंधित गुन्हेगारी कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. स्टेडियमच्या गेट परिसरातील सीसीटीव्ही चित्रफीत तपासण्यात येत असून, तांत्रिक साधनांच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
Leave a Reply