महाराष्ट्रातील राजकारणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाढती जवळीक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दोघांनीही आपापले मतभेद बाजूला ठेवून पुन्हा हातमिळवणी करण्याचे संकेत दिले असताना, शिंदेसेनेने या घडामोडींवर कठोर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदेसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली असून यांनी त्यांची तुलना ‘गोलमाल’ चित्रपटातील जॉनी लिव्हरच्या ‘भुला’ पात्राशी केली. तसेच, त्यांच्या भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
वाघमारे म्हणाल्या, “दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्यांचं स्वागत व्हावं, यात दुमत नाही. पण राजकारण म्हणजे मनमोहन देसाईंचा सिनेमा नव्हे! जिथे हरवलेले भाऊ एका गाण्याने पुन्हा भेटतात. महाराष्ट्रधर्म, मराठी अस्मिता हे विषय फक्त निवडणुकांच्या वेळीच आठवतात का?”
शिंदे गटाचे नेतृत्व करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचा अभिमानाने स्वीकार केला आणि त्यासाठी अनेक आरोपांचा सामना केला, असं वाघमारे यांनी सांगितलं. “गद्दार, खोके अशा आरोपांना सामोरे जात असूनही शिंदे साहेबांनी कधीही संयम सोडला नाही. मात्र, त्या काळात राज ठाकरे कुठे होते? आज मुंबई महापालिकेच्या सत्तेचा सुगंध येताच त्यांना महाराष्ट्रधर्म आठवू लागला आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
मनसे प्रमुखांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत शिंदेंवर अप्रत्यक्षपणे टीका करत ‘आयत्या पिठावर रेघोट्या’ असे विधान केले. यावर प्रत्युत्तर देताना वाघमारे म्हणाल्या, “रेघोट्या ओढल्या की नाही याचा फारसा फरक पडत नाही, पण बाळासाहेबांच्या मिठाला कोण जागलं, हे महत्त्वाचं आहे.”
राज ठाकरे यांच्या सातत्याने बदलणाऱ्या राजकीय भूमिका अधोरेखित करत वाघमारे यांनी त्यांची तुलना ‘गोलमाल’ चित्रपटातील जॉनी लिव्हरच्या ‘भुला’ पात्राशी केली. “कधी मोदींची स्तुती, कधी टीका; कधी पवार यांच्यासोबत, तर कधी विरोधात; कधी हिंदुत्वाचे नेते, तर कधी गंगेच्या पाण्यावर संशय व्यक्त करणारे – अशा सतत बदलत्या भूमिकांमुळे जनतेत संभ्रम निर्माण होतो,” असा आरोप त्यांनी केला.
शेवटी वाघमारे म्हणाल्या, “ठाकरे बंधू एकत्र येणार का नाही, हा मुद्दा गौण आहे. पण ते खरी भूमिका घेणार आहेत का? हे जनतेला पाहावं लागेल. त्यांनी दिशाभूल करणं थांबवावं.” या घमासान वक्तव्यामुळे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चेला नवा आयाम मिळाल्याचं दिसत आहे.
Leave a Reply