पुणे पोर्शे अपघात प्रकरण : ससूनमधील दोन डॉक्टरांचे वैद्यकीय परवाने तात्पुरते रद्द

पुण्यातील कल्याणीनगर येथे घडलेल्या भीषण पोर्शे अपघात प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी आरोपीच्या रक्षणासाठी रक्ताचे नमुने बदलल्याच्या प्रकरणी त्यांच्या वैद्यकीय परवान्यांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांच्यावर ही कठोर कारवाई केली असून, प्रकरणाचा अंतिम निर्णय येईपर्यंत त्यांचा परवाना रद्द ठेवण्यात आला आहे.

मे 2024 मध्ये पुण्यातील कल्याणीनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात घडला होता. एका अल्पवयीन मुलाने नशेत भरधाव वेगाने पोर्शे कार चालवत दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण व तरुणीला जोरदार धडक दिली होती. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. आरोपी मुलगा शहरातील नामवंत बिल्डरचा मुलगा असल्याने त्याला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न विविध पातळ्यांवर सुरू झाले. अपघातानंतर आरोपीला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना आर्थिक आमिष दाखवून त्याचे रक्तनमुने बदलण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी मुलाच्या रक्ताऐवजी त्याच्या आईचे रक्त नमुन्यादाखल सादर करण्यात आले. या प्रकारामुळे सामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला होता.

या प्रकरणाची सखोल चौकशी करताना पुणे पोलिसांनी ससूनमधील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांनी नमुने बदलल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही डॉक्टरांचे वैद्यकीय परवाने रद्द करण्याची शिफारस केली. आता महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने तातडीने निर्णय घेत त्यांचे परवाने तात्पुरते रद्द केले आहेत. या प्रकरणात सुरुवातीला आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला केवळ निबंध लिहण्याची शिक्षा देण्यात आली होती. मात्र, अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर आणि दिलेल्या शिक्षेच्या विरोधात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली.

त्यानंतर या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप, आर्थिक देवाणघेवाण आणि न्याय प्रक्रियेत हस्तक्षेप झाल्याचे आरोप झाले.या प्रकरणात आरोपी मुलाच्या पालकांसह ससून रुग्णालयातील डॉक्टर आणि अन्य संबंधित अशा एकूण दहा जणांना अटक करण्यात आली आहे. या अपघातामागे पुण्यातील नामवंत बिल्डर अग्रवाल यांचा मुलगा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही संपूर्ण घटना प्रशासन, वैद्यकीय व्यवस्था आणि कायद्याच्या अंमलबजावणी संस्थांच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *