पाऊस भरपूर तरीही हंडाभर पाण्यासाठी वणवण; पालघर जिल्ह्यातील अनेक गावात पाणीटंचाई

पालघर जिल्ह्यात दरवर्षी मोठ्याप्रमाणात पाऊस होत असला तरी जिल्ह्यातील अनेक भागात पाणी टंचाईचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. पाऊस भरपूर पडला तरी नियोजनाच्या अभावामुळे पाणीटंचाईची समस्या सुटलेली नाही. पालघर जिल्ह्यातील मोखाडा, वाडा, जव्हार, विक्रमगड या तालुक्यातील शेकडो गाव पाड्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतोय. पालघर जिल्ह्यातील हे तालुके आणि पाणीटंचाई असे समीकरण बनले आहे. नियोजनाचा अभाव असल्याने टँकरवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. सन २०१५ ते २०२१ या काळात टँकरने पाणीपुरठा करण्यासाठी चार कोटी १ लाख रुपयेपेक्षा अधिक खर्च करण्यात आला. गेल्या तीन वर्षात जवळपास एक कोटी ३७ लाख रुपये खर्च झाला आहे. शासनाने एकदाच कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटवावा, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे. पालघर जिल्ह्या अस्तित्वात येऊन 10 वर्ष झाली, मात्र अजूनही मोखाडा तालुक्याचा पाणीप्रश्न सुटला नाही.

फेब्रुवारी महिना संपताच पाणीटंचाई होते सुरू

फेब्रुवारी महिना संपताच येथे पाणीटंचाई व्हायला सुरू होते. लाहान मुले, महिला यांना 2 ते 3 किलोमीटर उन्हात घागरभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. काही भागात तर ओढ्यातील झरे फोडून तहान भागवली जाते. मोखाडासह विक्रमगड जव्हार, वाडा या तालुक्यांमध्ये अशीच टंचाईची परिस्थिती आहे. या तालुक्यांत सद्यस्थितीत सहा गावे तर ४५ पाड्यांना १९ टँकरने पाणीपुरवठा केला जातो. दिवसभरात टँकरच्या ५३ फे-या होतात. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत येथे आणखी १२ गावे आणि अंदाजे ७० पाड्यांमध्ये पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यासाठी २० ते २५ टँकरची गरज लागणार आहे.

पालकमंत्र्याचं आश्वासन

दरम्यान, मागच्यावर्षीच्या तुलनेत या वर्षी टँकरची संख्याही कमी झाली आहे असा दावा करताना पुढच्या वर्षी हे चार तालुके टँकरमुक्त केले जातील असे नियोजन सध्या सुरू आहे, असे पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी पत्रकारांना
सांगितले. प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा देणारी जलजीवन मिशन योजना ‘चार तालुक्यात अजूनही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना टॅकरच्या पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पाणी नसल्याने तसेच रोजगारासाठी स्थलांतर करत आहेत. चार तालुक्यांमध्ये मोठ्याप्रमाणात पाऊस पडतो. परंतु योग्य नियोजन नसल्यानेपाणी वाहून जाते. त्यामुळे पावसाच्या पाण्याचं योग्य नियोजन गरजेचं आहे.

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *