माटुंगा ते लोखंडवाला : शहरभर रस्ते खोदकामामुळे मुंबईकर हैराण

शहरातील अनियोजित व अव्यवस्थित रस्तेखोदाईमुळे मुंबईकरांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, यामुळे पादचाऱ्यांपासून ते आपत्कालीन सेवा यंत्रणांपर्यंत सर्वांनाच अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. विविध भागांतील नागरिक आणि सेवाप्रदात्यांनी आपल्या अडचणी मांडल्या आहेत. सायन कोळीवाड्यातील राजयोगी जयमल सिंग मार्गावरील काँक्रीटीकरणासाठी सुरू असलेल्या खोदकामांदरम्यान कोणतीही सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गुरु नानक महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांना, दिव्यांगांना आणि ज्येष्ठ नागरिकांना या परिस्थितीचा फटका बसत आहे.
महाविद्यालयाचे अभ्यागत प्राध्यापक के. प्रवेश विश्वनाथ अय्यर यांनी प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली.

मुलुंड पश्चिम येथील एम. टी. अग्रवाल रुग्णालयाजवळ खोदकाम सुरू असून, यामुळे वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषण वाढले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अलका दंड यांनी अनियोजित खोदकामांवर नाराजी व्यक्त करत, नुकतेच काँक्रीटीकरण झालेले रस्ते पुन्हा उखडल्याचे निदर्शनास आणून दिले.मुलुंड पूर्वेतील वामनराव मुरंजन विद्यालयाबाहेर सुरू असलेल्या कामांमुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना अडचणी येत आहेत. एका पालकाने यासंदर्भात प्रशासनाने तत्काळ पावले उचलण्याची विनंती केली आहे.

रुग्णवाहिका चालक संपत यांनी खड्डेमय रस्त्यांमुळे रुग्ण पोहोचवताना होणाऱ्या अडचणींबाबत चिंता व्यक्त केली. तर अग्निशमन दलातील मार्शल ए. एन. बच्चाव यांनी अनेक रस्ते एकाच वेळी बंद असल्याने पर्यायी मार्गच उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले.अंधेरी पश्चिमेतील एस. व्ही. पटेल नगर परिसरात अरुंद रस्ते आणि बंद मार्गांमुळे रहिवाशांसह आपत्कालीन सेवा अडचणीत सापडल्या आहेत. स्थानिक रहिवासी अभिजीत सोनोने यांनी याकडे लक्ष वेधले.

लोखंडवालामध्ये देखील काँक्रीटीकरण संथ गतीने सुरू असून, धुळीचे प्रमाण वाढले आहे. रहिवासी अनिल मेनन यांनी आपत्कालीन सेवा पोहोचण्यात अडथळ्यांचा इशारा दिला. मुंबईतील रस्तेखोदाई नियोजनशून्य आणि समन्वयाच्या अभावामुळे नागरिकांच्या सुरक्षेवर आणि आपत्कालीन यंत्रणांवर गंभीर परिणाम होत आहेत. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या समस्येकडे गांभीर्याने पाहणे आणि कामे जलदगतीने पूर्ण करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *