या रविवारी 4 मे रोजी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचं कारण म्हणजे रविवारी होणाऱ्या NEET च्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने साप्ताहिक मेगाब्लॉक रद्द केला आहे. त्यामुळे रविवारी लोकलने प्रवास करणाऱ्याना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेने जारी केलेल्या निवदेनात, “NEET परीक्षा देणारे विद्यार्थी आणि त्यांच्या सोबतच्या कुटुंबातील सदस्यांना सुरळीत आणि सोयीस्कर प्रवास करण्यासाठी मेन लाईन, हार्बर लाईन आणि ट्रान्स हार्बर लाईनवर कोणताही मेगा ब्लॉक राहणार नाही,” असे म्हटले आहे.
देशव्यापी प्री-मेडिकल प्रवेश परीक्षेच्या (NEET-2025) पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी रविवार, दि. 4 मे रोजी घेण्यात येणारा साप्ताहिक मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. याबाबत मध्य रेल्वेने एक निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईतील लोकलच्या देखभाल, दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणांसाठी रेल्वेकडून दर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. काही तासांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा थांबवल्या जातात किंवा कमी करण्यात येतात.
येत्या रविवारी कोणताही ब्लॉक नसला तरी उनगरीय लोकल गाड्या रविवारच्या वेळापत्रकानुसार कमी सेवांसह चालवल्या जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.पश्चिम रेल्वेवर अप आणि डाऊन फास्ट मार्गांवर चार तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगा ब्लॉक शनिवार/रविवार, म्हणजेच 3 आणि 4 मे रोजी रात्री 12.15 ते 4.15 दरम्यान मुंबई सेंट्रल आणि माहीम स्थानकांदरम्यान घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत सांताक्रूझ आणि चर्चगेट स्थानकांदरम्यान जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर चालवल्या जातील, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले.
Leave a Reply