जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या देशात आता तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने अनेक राज्यांना युद्धसज्जतेसाठी उद्या 7 मे रोजी मॉक ड्रिल म्हणजे युद्धकाळात बचाव कसा करायचा, याचा सराव करण्याचे निर्देश दिले आहे. युद्धासाठी पूर्ण सज्ज व्हा आणि युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे केंद्र सरकारकडून निर्देश देण्यात आले आहे. देशभरातील 244 जिल्ह्यात हा युद्धसराव घेतला जाणार आहे. मंत्रालयाच्या सूत्रांच्या मते, हवाई हल्ल्याचा इशारा देणारा सायरन कधी आणि कसा वाजेल? याबद्दल एक मॉक ड्रिल असेल. देशातील अनेक राज्यांमध्ये नागरी संरक्षण विभागाला मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यासाठी सरकारने मॉक ड्रिल आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी 1971 साली भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारचा मोठा मॉक ड्रिल आयोजित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर 2025 मधील हा मॉक ड्रिल अधिक संवेदनशील मानला जात आहे. 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे.सरावादरम्यान एअर स्ट्राईक, ब्लॅकआउट, सायरन कार्यान्वयन, हेरिटेज इमारतींचं संरक्षण, आणि आपत्कालीन बचाव मोहिमांचा समावेश असणार आहे. या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये सजगता निर्माण होईल आणि संभाव्य त्रुटी ओळखून योग्य सुधारणा करता येतील.
मॉक ड्रिल दरम्यान काही उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. हल्ल्याच्या वेळी म्हणजेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना वाचवण्यासाठी पुढील उपाय असतील. हल्ल्याच्या दरम्यान स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरिक आणि विद्यार्थ्यांना नागरी सुरक्षिततेच्या प्रत्येक स्तरावर प्रशिक्षण दिले जाणार आहे.
गरज पडल्यास वीज बंद करता यावी यासाठी क्रॅश ब्लॅक आउट उपायांचे प्रशिक्षण देण्यात येईल, जेणेकरून शत्रूला लक्ष्य गाठता येऊ नये.
महत्त्वाचे कारखाने, कार्यालये आणि ठिकाणे लपविण्यासाठी आगाऊ प्रशिक्षण दिले जाईल.
परिस्थिती बिघडल्यास ठिकाण कसे सोडायचे याचा सराव करण्यात येईल, म्हणजेच निर्वासन योजना देखील समाविष्ट केली जाईल.
Leave a Reply