मुंबई : महावितरण कंपनीने वीजदर वाढीसाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे (SERC) फेरविचार याचिका दाखल केली आहे. राज्य नियामक आयोगाने आधीच वीजदर कपात मंजूर केली होती, परंतु आता आर्थिक अडचणींमुळे महावितरणने पुन्हा वीजदरवाढीसाठी मागणी केली आहे. वीजदरवाढीसाठी महावितरण कंपनीने राज्य वीज नियामक आयोगापुढे फेरविचार याचिका सादर केली असून त्याबाबत जनतेला बाजू मांडण्याची संधी मिळावी, अशी मागणी ग्राहकांतर्फे राज्य वीज नियामक आयोगापुढे मंगळवारी करण्यात आली. आयोगाने एक एप्रिलपासून महावितरणचे वीजदर कमी करण्याबाबतचे आदेश देत पुढील पाच वर्षांचे वीजदर निश्चित केले होते आणि त्याबाबतचे आदेश २८ मार्च रोजी जारी केले होते. मात्र आयोगाच्या आदेशात अनेक त्रुटी असल्याचा आक्षेप घेत व त्याबाबत एप्रिलअखेरीस याचिका सादर केली जाईल, असे नमूद करून महावितरणने आयोगाकडे वीजदर निश्चितीला स्थगिती मागितली होती.
आयोगाने ती विनंती मान्य करुन वीजदर कपातीला स्थगिती दिली आहे व सध्या आयोगाच्या आदेशानुसार गेल्यावर्षीच्या दरांनुसार वीजबिले पाठविण्यात येत आहेत. महावितरणने आयोगापुढे ३० एप्रिलला फेरविचार याचिका सादर केली आहे. मात्र, त्यातील तपशील आयोग किंवा महावितरणने जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे ही याचिका सार्वजनिक करून जनतेला त्यावर म्हणणे मांडण्याची संधी मिळावी, अशी मागणी प्रयास संस्थेचे अध्यक्ष शंतनु दीक्षित यांनी मंगळवारच्या सुनावणीत केली.
Leave a Reply