देहू – आळंदीहून पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीमध्ये चालणारी लक्ष, लक्ष पावले जरी निघालेली असतात पंढरपूरला, सावळ्या विठ्ठलाच्या ओढीने, पण त्यांच्या ओठी असतो ‘ग्यानबा – तुकाराम’चा अखंड गजर. वारकरी उठता – बसता सदैव आठवत असतात, स्मरत असतात, माउली ऽ माउली… म्हणून, या संपूर्ण दिंडीत, जिथे जाईल तिथे, ज्ञानेश्वर माउलींचा रथ महत्वाचे आकर्षण असतो. एका फुलावर असंख्य फुलपाखरे झेपावताना जसं दृश्य दिसेल. तसंच चित्र या रथाभोवती कायम असतं. जणू लेकरांना आईचा पदर सोडवावसा वाटू नये… तसा पांढर्या शुभ्र वारकऱ्यांच्या गराड्यात उठून दिसतो आमच्या माऊलीचा रथ. फुलांनी आणि माउलींच्या वारकरी मुलांनी सजलेला, दिव्य रथ…
पण आता त्या पावित्र रथाशी स्पर्धा करायला राजकीय पक्ष पुढे सरसावलेले दिसताहेत. शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या माध्यमातून दिंडीत “वारकरी सेवा रथ” घेऊन पहिल्यांदाच राजकीय घुसखोरी होणार आहे. हे योग्य नाही. या नव्या रथावर ज्ञानोबा – तुकाराम नसतील तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुत्र श्रीकांत शिंदे आणि त्यांचे पक्षातले वारकरी महाराज असतील. शिंदे सेना सोबत कायम स्पर्धा करणार्या उद्धव सेनेतर्फे उद्या असाच ‘सेवाभाव’ दाखवत शिंदेंपेक्षा मोठा “रथ” काढला जाईल. मग हिंदुत्वावर पहिला हक्क आपला आहे, असे मानणारा भाजप, ज्यांच्या दिग्विजयी रथयात्रेचा इतिहास अवघा भारत जाणतो. ते कसे मागे राहतील. इंद्रायणी काठची देहू – आळंदी ही पुण्यक्षेत्रे, पुणे जिल्ह्या येतात, त्यामुळे पुणे जिल्ह्याचे कर्तेपण मिरवणारे दोन्ही राष्ट्रवादी पक्ष आणि इतर राजकीय संघटना, अगदी असाउद्दीन ओवैसी यांचा एम आय एम सुद्धा, आपापले “रथ”, “महारथ” घेऊन दिंडीत खुलेआम प्रवेश करू शकतील. दिंडीत ते सेवेच्या नावाने मेवा वाटप करतील आणि सुमारे सव्वासातशे वर्षांहून अधिक काळ सुरु असलेल्या एका उज्वल परंपरेला आपापल्या राजकीय गरजेनुसार वापरण्याचा प्रयत्न करतील.
मग त्यावेळी सामान्य वारकरी काय करणार ?
श्री विठ्ठलाच्या भक्तिप्रेमात न्हाऊन निघालेले, प्रबोधन युगाचे उद्गाते संत शिरोमणी नामदेवराय महाराजांच्या सोबत “माझे जिवीची आवडी | पंढरपूरा नेईन गुढी |” असा निर्धार, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराजांनी केला होता. धर्म परंपरेची जुनाट चौकट मोडून काढत, संत नामदेवांनी भक्ती चळवळ उभी केली. तिला जीवनानुभवी तात्विक बैठक देण्याचे कार्य केले, संत श्री निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर महाराज या दोन लोकहितैषी तत्वचिंतकानी. म्हणून महाराष्ट्राला स्वतंत्र विचार, समानता, बंधुता आणि संयमाचे धडे बाहेरून घेण्याची कधी गरज भासली नाही . मराठी संतांनी आपल्या अभंग वाङ्मयातून अवघ्या मराठी समाजाचे वैचारिक भरण – पोषण इतक्या चांगल्या प्रकारे केले, की अगदी आधुनिक काळातही आमची महाराष्ट्र भूमी कायम स्वराज्य, स्वातंत्र्य, समतेचा उद्घोष करताना दिसली. पुरोगामी विचार आणि ध्येय धोरणांचा पुरस्कार करताना दिसली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि अटकेपार भगवा झेंडा फडकावणारे असंख्य महायोद्धे याच भूमीत झाले. याच मराठी योद्ध्यांनी १८५७ मध्ये पहिल्यांदा ब्रिटिशांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकावला होता. “स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे”, ही सिंहगर्जना लोकमान्यांच्या मुखातून उमटली, ती याच महाराष्ट्र देशी.
संतांचे समतेचे, मानवतेचे, न्यायाचे आणि सर्वांना सन्मान देणारे विचार महाराष्ट्र भूमिमध्ये रुजले होते, म्हणुनच इथे महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे ऐतिहासिक कार्य वाढले आणि फोफावले. देशातील तमाम राजे रजवाडे ऐशआरामात दंग असताना, ‘जाणते राजे’ छत्रपती श्री शाहू महाराज, बडोदा नरेश सयाजीराव महाराज हे देश, धर्म आणि समाज घडविण्याचे महान कार्य करत होते. त्यामुळेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अफाट कार्याला मोकळे अवकाश लाभले. या संत विचारांचा, संस्कारांचा प्रभाव एव्हढा मोठा होता की, राष्ट्रीय कॉंग्रेसला वाढवणार्या न्या महादेव गोविंद रानडे आणि लोकमान्य टिळक यांच्या लेखनात, बोलण्यात कायम संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगाचे उल्लेख येत. त्यामुळे न्या रानडे यांचे पट्टशिष्य गोपाळ कृष्ण गोखले आणि महात्मा गांधी यांनाही मराठी संत विचारांनी भारून टाकले होते. महात्मा गांधी यांनी त्यांच्यावर प्रभाव टाकणार्या, तुकाराम महाराज यांच्या सोळा अभंगाचे इंग्रजीमध्ये भाषांतर करून घेतले होते. आणि ते अभंग त्यांच्या आश्रम प्रार्थनेत सगळेजण म्हणताना दिसायचे… तुम्ही कल्पना करून पहा, गांधीजींच्या आश्रमात सकाळच्या वेळी, डॉ राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, सरदार पटेल, खान अब्दुल गफार खान आदी मान्यवर प्रार्थनेला बसले आहेत आणि ते “वृक्ष वल्ली आम्हा सोयरे” हा तुकोबांचा अभंग आळवून म्हणत आहेत… हे सगळं काल्पनिक कथाकथन नाही, तर वर्धा येथील सेवाग्राममध्ये त्याकाळात रोज घडणारी गोष्ट आहे… त्यानंतर आचार्य विनोबा भावे यांच्या काळातही असंच घडताना दिसे…
द्वितीय सरसंघचालक श्री गोळवलकर गुरुजी यांच्या नागपुरातील समाधीवर श्री गुरुजींच्या हस्ताक्षरात ठळकपणे दिसणारा “शेवटची विनवणी । संतजनीं परिसावी ।। विसर तो न पडावा । माझा देवा तुम्हांसी ।। पुढे फार बोलो काय । अवघे पायां विदित ।। तुका म्हणे पडिलों पायां । करा छाया कृपेची ।” हा तुकाराम महाराज यांचा अभंग तीच महाराष्ट्राला लाभलेली संत साहित्याची परंपरा अधोरेखित करतो… पण, आम्हाला ते खरं वाटत नाही. पटत नाही. कारण, हल्ली आम्ही आमचा उज्वल इतिहास विसरलो आहोत. त्याचे अनुकरण राहिले दूर. म्हणून पंढरीच्या दिंडीचा हा पालखी सोहळा, जो महाराष्ट्राच्या भक्ती, परंपरा आणि शिस्तीचे प्रतीक आहे. तो आपण सर्वानी मिळून जपला पाहिजे. सांभाळला पाहिजे.
….सेवेच्या नावावर दिंडीत राजकारण घुसवण्याचा जो अश्लाघ्य प्रकार सुरु होत आहे. तो थांबावा, असे वाटते. मध्यंतरी याच एकनाथ शिंदे यांच्या आध्यात्मिक सेनेचे महाराज अक्षय भोसले यांनी आळंदीत मोठ्या थाटामाटात “मोफत ज्ञानेश्वरी वाटप केले”. लक्षात घ्या, भाविकांना कोणी आग्रहाने “ज्ञानेश्वरी” देऊ केली, तर तो या पावित्र ग्रंथाला नाही म्हणू शकत नाही. पण, “ज्ञानेश्वरी ही काय मोफत वाटायची गोष्ट आहे का?” असा माझा प्रश्न आहे.
वारकर्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन, पैशासाठी, पदासाठी लाचार झालेल्या आळंदी संस्थानच्या कार्यक्रमात हा उपक्रम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साथीदार उदय सामंत, भारत गोगावले आदी मंत्री महोदयांच्या हस्ते पार पडला. त्याविरोधात एकही निष्ठावान वारकऱ्याच्या, संतांच्या अभंगावर गावोगावी कीर्तन करून जगणार्या, पोटभर्याच्या तोंडून ब्र शब्द निघाला नाही… म्ह्णून मोफत छत्री, चष्मे, मोफत तांदूळ – गहू वाटणाऱ्या राजकीय पक्षांचे, आणि हो आता वारकरी मतांसाठी मोफत गाथा- ज्ञानेश्वरी वाटणार्या भ्रष्ट राजकारण्यांचे तथाकथित “सेवा रथ” आता वारकऱ्यांच्या दिंडीत घुसतील आणि दिंडीच्या शेजारून चालणार्या बाहेरच्या मंडळींचे लोंढे दिंडीची शिस्त मोडून, वारी सोडून पुढे धावत राहतील, अशी भीती वाटते.
खरा वारकरी, असा हात पसरणारा नसतो. तो “भिक्षापात्र अवलंबिणे, जळो जिणे लाजिरवाणे” हा तुकोबांचा बाणा जपणारा असतो…लक्षात ठेवा, हा वारकरी, आपल्या संसारिक जीवनात कितीही अडचणींमध्ये असो, वारीच्या काळात सर्वकाही मागे टाकून वारकरी घराबाहेर निघतात, फक्त ‘नामस्मरणा’साठी. पायात चपला, डोक्यावर छत्री असो नसो, खिशात मोबाईल, आसपास रेंज असो नसो. पण हृदयात फक्त विठ्ठलाच्या दर्शनाची आस असते. वारीदरम्यान पावसाचा मारा, उन्हाची झळ, भूक, थकवा… या सर्व त्रासांवर मात करत, वारकरी ” गळ्यात माळ , हातात टाळ , आणि ओठांवर अभंग” असे भक्तीरसात चिंब भिजलेले असतात. असा आहे हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेचा अमूल्य ठेवा म्हणजे संतांची वारी. तो कुणा राजकीय नेत्याच्या दावणीला बांधलेला महाराष्ट्र पाहू शकत नाही. याची जाणीव शिंदे सेनेतील नेत्यांना नसावी, याचे आश्चर्य वाटते.
तसे पाहिले तर,दिंडी मार्गावरील गावागावातून वारकर्यांना मोठ्या श्रद्धेने मदत मिळते. इतक्या वर्षापासून चालत आलेली ही वारी लोकाश्रय होता, म्हणुनच टिकली. आजही दिंडी मार्गावर वाटेत भेटणारे गावकरी वारकऱ्यांसाठी अन्नदान, पाण्याची व्यवस्था, औषधे, निवास अशा अनेक प्रकारच्या सेवा करतात. ही मदत फार मोठ्या मनाने केली जाते आणि त्याचा स्वीकारही तितक्याच नम्रतेने केला जातो. पण आता आपल्या दातृत्वाची जाहिरात करणारे, मदतीची गरज नसताना वस्तूंची खैरात करणारे, खिचडी वाटप, फळे वाटप इत्यादी असंख्य स्टॉल दिंडी मार्गावर असतात. त्यांना कुणीतरी आवर घातला पाहिजे.
१९९० पूर्वी हा पालखी सोहळा तुलनेने मर्यादित होता. रथापुढे २७ आणि रथामागे १०१ दिंड्या, एकूण साधारण २५,००० वारकरी असत. मात्र १९९२ साली धर्मपुरी आणि नीरा नदीकाठी स्वागताची परंपरा सुरू झाल्यानंतर या सोहळ्याला शासनाचा अधिकृत सहभाग लाभला. तत्कालीन पालकमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पुढाकारामुळे पालखी मार्गावरील आरोग्यसेवा, पाणी, मुक्कामाचे तळ, आणि गावोगाव अनुदान यासारख्या सुविधा सुरू झाल्या. त्यामुळे ही केवळ धार्मिक परंपरा न राहता, वारी ही लाखो लोकांची एक आनंद यात्रा बनली आहे…
पालखी सोहळ्याची खरी शिस्त आणि गौरवशाली परंपरेची सुरुवात झाली ती १८३२ साली, हैबतबाबा पवार- आरफळकर जे महादजी शिंदे यांच्या सैन्यात सरदार होते. त्यांनी लष्करी शिस्त या सोहळ्यात आणली. त्यांच्यामुळेच तत्कालीन मराठा साम्राज्यातील मोठे सेनापती, संस्थानिक शिंदे, होळकर, अंकलीचे शितोळे सरकार, खंडोजीबाबा आदींनी यात मनोभावे सहभाग घेतला. आजही माऊलींचा अश्व, रथ, दिंड्यांचा अनुशासित क्रम, रिंगण सोहळ्याची काटेकोरता ही सर्व शिस्त त्यांच्याच वारशाचा भाग आहे. हे सारे समजून घेण्यासाठी वारीत प्रत्यक्ष चालण्याचा अनुभव घेतला पाहिजे. मी अनुभवाने सांगतो, की दिंडीत असंख्य माउलींच्या सान्निध्यात १६, १७ दिवस चालताना. रस्त्यावर बसणे, शेतात जेवणे, एखाद्या झाडाखाली पहुडणे अनुभवताना शब्दशः विश्वरुप दर्शन घडते. आपला महाराष्ट्र, मराठी समाज अन्य राज्यांपेक्षा वेगळा का आहे, याचे उत्तर दिंडीत मिळते. विख्यात मानववंश शास्त्रज्ञ डॉ इरावती कर्वे यांनी उगाच नाही लिहून ठेवले आहे. की, “ज्या राज्यातील लोक वारी करतात, तो प्रदेश म्हणजे महाराष्ट्र”…. म्हणुन कळकळीने सांगतोय, वारीतील शिस्तबद्धतेचा हा आदर्श वारसा, आपण राजकारण बाहेर ठेऊन जपला पाहिजे. वारीत फक्त माऊलींचाच रथ मोठा असेल, कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. याचे भान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांना नसेल, असे मला वाटत नाही. पण त्यांनी ते कृतीतून दाखवावे. संत माऊलींसोबत राजकीय नेत्यांचे, चिरकूट महाराजांचे फोटो असणारे, फलक, बॅनर हल्ली दिंडी मार्गावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. कृपया तेही टाळावे . आमचा वारकरी संप्रदाय सहनशील लोकांचा समुदाय आहे. त्यांच्या हृदयात प्रेम आणि दया भरलेली असते. याचा अर्थ ते वेडे – गबाळे नसतात. खोर्याने ओढलेल्या आणि खोक्यातून आलेल्या पैशाने भरलेले “अक्षय पात्र” समोर आल्यावर, जगाला उपदेश करणारे, भले भले मठाधिपती, महाराज कसे विनम्र होतात, याचे असंख्य फोटो सोशल मीडियावर उपलब्ध आहेत.
म्हणुनच, आता तरी, कोणी बोलत नाही म्हणून काहीही करायचे, हे असले प्रकार समजूतदार, शहाण्या लोकांनी आपणहून थांबवावे… त्यातच त्यांचे आणि महाराष्ट्राचे हित असेल…
महेश म्हात्रे
महाराष्ट्र रिसर्च सेंटर
Leave a Reply