मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शाब्दिक युद्ध अधिकच तीव्र झाले आहे. दोन्ही गटांनी आपापल्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत मेळावे घेतले, जिथे एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीवरून शिंदे गटाला आव्हान देत “कम ऑन किल मी, पण येताना ॲम्ब्युलन्स घेऊन या” असे म्हटले, तर एकनाथ शिंदे यांनी त्याला प्रत्युत्तर देत “मरे हुए को क्या मारना, तुम्हाला मतदारांनी आधीच गाडले आहे” असा पलटवार केला.
“येताना सरळ याल, जाताना आडवे व्हाल!”
षण्मुखानंद हॉल येथे शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि माजी आमदार दिवाकर रावते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. “जे जनतेच्या मनात आहे ते होऊ नये आणि मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये यासाठी काही जण हॉटेलमध्ये गाठीभेटी घेत आहेत,” असे ते म्हणाले. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर बोलताना ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. “हिंदी सक्ती करून बघा, अंगावर येणार असाल तर मी उभा आहे, कम ऑन किल मी. पण, येताना ॲम्ब्युलन्स घेऊन या. येताना सरळ याल; परंतु, जाताना आडवे व्हाल,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आपण तयार असून, “जे तुमच्या, महाराष्ट्राच्या मनात आहे ते करायला तयार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. “काहीही झाले तरी मुंबई त्यांच्या हाती देणार नाही. शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचे प्रयत्न कराल तर भाजपचे नामोनिशान पुसून टाकू,” असे आव्हानही ठाकरे यांनी दिले. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी (मनसे) युती करण्याचे संकेतही दिले.
एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर
“मनगटात जोर नसताना वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही”
दुसरीकडे, शिंदेसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात उपमुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला. यावेळी ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांच्यासह अनेक पक्ष सहकारी उपस्थित होते, ज्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई महापालिकेची प्रतिमा भेट दिली. शिंदे म्हणाले, “माणसाचे दिवस कधी बदलतील सांगू शकत नाही. सत्तेत होते तेव्हा सगळ्यांना कस्पटासमान समजणाऱ्यांची आज काय अवस्था झाली आहे. माझ्याशी युती करता का म्हणून आज ते किती अगतिक, उतावीळ आणि लाचार झाले आहेत.” उद्धव ठाकरेंच्या “कम ऑन किल मी” या आव्हानाला प्रत्युत्तर देताना शिंदे म्हणाले, “ते म्हणाले कम ऑन किल मी, पण मरे हुए को क्या मारना है, महाराष्ट्राने विधानसभा निवडणुकीत तुमचा मुडदा पाडला आहे.” त्यांनी पुढे म्हटले, “मारायला आलात तर ॲम्ब्युलन्स घेऊन या असेही म्हणाले, पण नुसता करून शोर मनगटात येत नाही जोर, वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही, त्याला शेर का कलेजा लागतो.”
शिंदे यांनी आगामी निवडणुकांवरही भाष्य केले. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महायुती म्हणून लढायच्या असल्याचे त्यांनी जाहीर केले. उबाठाचे मुंबईतील ५० नगरसेवक व इतर पक्षाचे मिळून ६५ माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत.” कार्यकर्त्यांना उद्देशून शिंदे म्हणाले, “तुम्ही निवडणुकीच्या कामाला लागा. विधानसभा जिंकलो म्हणून गाफील राहू नका, प्रत्येक निवडणूक जिंकायची.”
Leave a Reply