नवी दिल्ली: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या वादावर तातडीने सुनावणी व्हावी, यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (उद्धवसेना) बुधवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर हा मुद्दा मांडण्यात आला. खंडपीठाने या याचिकेवर १४ जुलै रोजी सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.
या याचिकेमध्ये ७ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका आदेशाला आव्हान देण्यात आले आहे. ७ मे रोजी न्यायालयाने उद्धवसेनेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता, जेव्हा उद्धवसेनेने विधानसभा अध्यक्षांच्या ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निर्णयाविरोधात अर्ज दाखल केला होता. त्यावेळी उद्धवसेनेच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता की, विधानसभा अध्यक्षांनी २०२३ मध्ये केवळ विधिमंडळातील संख्याबळावर आधारित हा निर्णय दिला, जो घटनापीठाच्या निर्णयाच्या विरोधात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) ‘घड्याळ’ चिन्हावरील वादात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या धर्तीवरच ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबतही आदेश मिळावा, अशी उद्धवसेनेची प्रमुख मागणी आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला ‘घड्याळ’ हे चिन्ह वापरण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे, असे मराठी आणि इतर वृत्तपत्रांमध्ये जाहीर करण्याचे आदेश दिले होते. शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील वादात दिलेल्या याच आदेशानुसार शिवसेना चिन्हावरही असाच आदेश द्यावा, अशी उद्धवसेनेची मागणी आहे. यामुळे ‘धनुष्यबाण’ चिन्हाचा वाद आणखी किती काळ सुरू राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Leave a Reply