मुंबई: कृषी विभागात कथित मोठ्या प्रमाणावर झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा पत्र लिहून तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील कथित गैरव्यवहारांची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी केली आहे. धस यांनी आपल्या पत्रात कृषी खात्यातील अनेक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत आणि त्यांच्याविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. कृषी विभागातील विविध योजनांमधील गैरव्यवहारांबाबत केलेल्या तक्रारींवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. जोपर्यंत भ्रष्टाचारात गुंतलेले अधिकारी त्यांच्या पदांवर आहेत, तोपर्यंत या प्रकरणी लोकप्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता कमी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
धस यांच्या म्हणण्यानुसार, कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना संरक्षण दिले असल्याचा दावाही त्यांनी पत्रात केला आहे. या पत्रात नॅनो युरिया, नॅनो डीएपी, मेटाल्डीहाईड, बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप आणि कापूस साठवणूक बियाणे खरेदीतील कथित भ्रष्टाचाराचा उल्लेख आहे. या प्रकरणांची स्वतंत्रपणे एसआयटी स्थापन करून चौकशी करण्याची मागणी धस यांनी यापूर्वीही केली होती. मात्र, उच्च न्यायालयात या प्रकरणी जनहित याचिका दाखल असून, लोकायुक्त यांच्याकडेही या प्रकरणाबाबत कारवाई सुरू असल्याचे सांगत एसआयटी स्थापन केली नसल्याचे धस यांनी निदर्शनास आणून दिले आहे. विशेष चौकशी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर, नाशिक विभागीय कृषी आयुक्त प्रदीप गिवाम किंवा पीएनपीएलच्या अध्यक्ष दीपा मुधोळ-मुंडे यांची नियुक्ती करावी, अशी विनंतीही धस यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
Leave a Reply