नवी दिल्ली: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेले आपले संबंध आणि आगामी राजकीय वाटचालीसंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्यामध्ये कोणताही मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवाराला शिवसेनेचा बिनशर्त पाठिंबा असेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत शिंदे म्हणाले की, सरकार लोकांच्या विकासासाठी काम करत आहे आणि आमची विचारधारा एकच आहे. तसेच,सद्यस्थितीत खुर्चीसाठी आमच्यात कोणतीही स्पर्धा नाही. भाजप आणि शिवसेनेची ‘महायुती’ राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकजुटीने लढणार आहे, असेही ते म्हणाले.
अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीचे कारण
दिल्ली वारीत त्यांनी अमित शाह यांच्याकडे कोणतीही तक्रार केली नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या खासदारांच्या मतदारसंघातील कामांबाबत चर्चा करण्यासाठी त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याचे सांगितले. संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने शिवसेनेचे सर्व खासदार दिल्लीत होते, त्यामुळे त्यांना घेऊन गृहमंत्र्यांची भेट घेतल्याचे शिंदे म्हणाले. अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीनंतर पत्रकारांनी फडणवीसांसोबतच्या मतभेदांबद्दल विचारले असता, शिंदे यांनी या सर्व चर्चांचे खंडन केले. “माझे मुख्यमंत्रीसोबत कोणतेही मतभेद नाहीत. जनतेचे कल्याण आणि राज्याचा विकास हाच आमच्या दोघांचा अजेंडा असल्याने मतभेद किंवा नाराजीचा प्रश्नच येत नाही,” असे शिंदे यांनी सांगितले.
Leave a Reply