मुंबई: मंत्रालयात मंत्री कार्यालये आणि काही कक्षांनी सामान्य नागरिकांना बसण्यासाठी असलेल्या जागांवर अतिक्रमण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मंत्रालयातील भीषण आगीला १३ वर्ष उलटल्यानंतरही त्या दुर्घटनेतून काहीच बोध घेतला नसल्याचा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
ब्रिज रोड बंद, सामान्यांना प्रवेश अशक्य
मंत्रालयाची मुख्य इमारत आणि विस्तारित इमारतीला जोडणारा ब्रिज प्रवासासाठी बंद करण्यात आला आहे. बांधकाम सुरू असल्यामुळे तात्पुरत्या मार्गांचा वापर केला जात आहे. मात्र, नागरिकांसाठी बसण्याच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने ब्रिज रोड बंद करण्यात आला आहे, ज्यामुळे अनेक सामान्य नागरिकांना मंत्रालयात येणे अशक्य झाले आहे. गृह राज्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांसाठीच्या बैठकांच्या जागांवरही अतिक्रमण झाल्याचे फोटोमधून दिसत आहे.
मंजुरीपेक्षा जास्त जागा बळकावली
अधिकारी, वैद्यकीय शिक्षण, ग्रामविकास आणि पाणीपुरवठा या विभागांना कामासाठी दिलेल्या जागांपेक्षा अधिक जागा बळकावल्या आहेत. कॅबिनेट आणि सर्वसाधारण विभागांनीही त्यांना मिळालेल्या जागेपेक्षा जास्त जागा वापरत असल्याची माहिती आहे. यामुळे अधिकारी, कर्मचारी आणि सामान्य नागरिकांना कामासाठी योग्य जागा मिळत नाही, त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत.
एअर इंडिया इमारतीचा ताबा रखडला
एअर इंडियाच्या इमारतीची सुरक्षा व्यवस्था अजूनही सरकारकडे आलेली नाही. सुरक्षा व्यवस्थेसाठी राज्य सरकारने २० कोटी रुपये मंजूर केले आहेत, पण अद्याप पैसे दिलेले नाहीत. मंत्रिमंडळ बैठकांसाठीही २० कोटी रुपये मंजूर झाले असले तरी, राज्य सरकारने निधी दिला नसल्याने कामाला सुरुवात झाली नाही. एकदा निधी मिळाल्यावर सुरक्षा व्यवस्था आणि बैठकांसाठीची कामे सुरू होतील आणि इमारतीचा ताबा सरकारकडे येईल.
शासनाचे दुर्लक्ष
या गंभीर अतिक्रमणाकडे शासनाचे लक्ष नाही, अशी चर्चा सुरू आहे. सामान्य नागरिकांना बसण्यासाठी योग्य जागा मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे. याप्रकरणी सविस्तर माहिती घेण्यासाठी काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मदत घेतली जात आहे.
Leave a Reply