मुंबई – वसई-विरार शहरातील ६० एकर जमिनीवर उभ्या असलेल्या ४९ अनधिकृत इमारतींच्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक केली आहे. यासोबतच नगर रचनाकार डाय, एस. रेड्डी तसेच बांधकाम प्रकरणातील मुख्य सूत्रधार सीताराम गुप्ता आणि त्यांचा मुलगा अरुण गुप्ता यांनाही अटक करण्यात आली आहे.
ईडीच्या म्हणण्यानुसार, अनिलकुमार पवार यांनी या अनधिकृत बांधकामांसाठी प्रति चौरस फूट २० ते २४ रुपये लाच घेतली, तर नगर रचनाकार डाय, एस. रेड्डी यांनी प्रति चौरस फूट १० रुपये लाच घेतली. याप्रकरणात कनिष्ठ अभियंते, वास्तुविशारद, सनदी लेखापाल आणि अनेक एजंटदेखील सामील असल्याचे समोर आले आहे.
यापूर्वी ४ ऑगस्ट रोजी ईडीने पवार आणि त्यांच्या पत्नीची चौकशी केली होती. २७ जुलै रोजी ईडीने पवार यांच्यासह १८ ठिकाणी छापे टाकले होते. त्यात नाशिकमध्ये त्यांच्या पुतण्याच्या घरी १ कोटी ३३ लाख रुपयांची रोकड सापडली होती. याशिवाय, ८ कोटी ३४ लाख रुपयांची रोख रक्कम, २३ कोटी २४ लाख रुपये किमतीचे हिरे आणि दागिने, १३ कोटी ८६ लाख रुपयांचे शेअर्स आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी मीरा-भाईंदर पोलिसांत अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.
Leave a Reply