मुंबई: आता बँकेतील चेक क्लिअर होण्यासाठी दोन-तीन दिवस थांबण्याची गरज नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चेक क्लिअरिंगची नवीन पद्धत जाहीर केली आहे, ज्यामुळे चेक काही तासांतच क्लिअर होतील. ४ ऑक्टोबर, २०२५ पासून याची अंमलबजावणी दोन टप्प्यात केली जाईल.
पहिल्या टप्प्यात, ४ ऑक्टोबर, २०२५ ते २ जानेवारी, २०२६ पर्यंत सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत स्वीकारले जाणारे चेक लगेच स्कॅन करून क्लिअरिंग हाऊसला पाठवले जातील. ज्या बँकेचा चेक असेल त्या बँकेला संध्याकाळी ७ वाजेपर्यंत तो मंजूर किंवा नामंजूर करावा लागेल. जर बँकेने वेळेत उत्तर दिले नाही, तर तो चेक आपोआप मंजूर मानला जाईल.
दुसऱ्या टप्प्यात, ३ जानेवारी, २०२६ पासून हा नियम अधिक कठोर होईल. चेक मिळाल्यानंतर जास्तीत जास्त तीन तासांच्या आत बँकेला मंजुरी द्यावी लागेल. उदाहरणार्थ, सकाळी १० ते ११ च्या दरम्यान मिळालेल्या चेकसाठी दुपारी २ वाजेपर्यंत उत्तर देणे बंधनकारक असेल. जर बँकेने वेळेत मंजुरी दिली नाही, तर तो चेक मंजूर मानला जाईल आणि सेटलमेंटमध्ये धरला जाईल. या नव्या नियमांमुळे चेक क्लिअर होण्यासाठी लागणारा वेळ दोन दिवसांवरून काही तासांवर येईल. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार असून, आर्थिक व्यवहार अधिक जलद आणि सोपे होतील. सेटलमेंट झाल्यावर बँकेने ग्राहकांना लगेच पैसे देणे अनिवार्य असेल, ज्याची कमाल मर्यादा एक तास असेल. हा निर्णय डिजिटल पेमेंटच्या युगात एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
Leave a Reply