प्रयागराज : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रमुख महंत रवींद्र पुरी यांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे १३ जानेवारी २०२५ ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणाऱ्या महाकुंभ मेळ्यात हिंदुं व्यतिरिक्त इतर धर्माच्या दुकान लावण्यास परवानगी देण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे.
महंत रवींद्र पुरी यांनी महाकुंभाचे पावित्र्य टिकवून ठेवण्यावर भर देत बिगर-हिंदूंना दुकाने लावू देणे अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले. त्यांनी म्हटले, “इतर धर्मांच्या लोकांना चहाची दुकाने, ज्यूस स्टॉल्स किंवा फुलांची दुकाने चालवण्याची परवानगी दिली गेल्यास, ते कार्यक्रमाच्या वातावरणाला बाधा पोहोचवतील. महाकुंभाचे पवित्र वातावरण राखण्यासाठी हे टाळले पाहिजे.”
याशिवाय, महंत पुरी यांनी “शाही स्नान” या शब्दातील ‘शाही’ हा शब्द उर्दू असल्याचा उल्लेख करत, महाकुंभात संस्कृत किंवा हिंदी भाषेच्या शब्दांना प्राधान्य दिले जावे, अशी मागणी केली. “आम्ही उर्दू भाषेच्या विरोधात नाही, पण धर्म, परंपरा आणि संस्कृतीच्या संदर्भात हिंदी व संस्कृत भाषांचा उपयोग आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात महाकुंभाचा गौरव करताना या सोहळ्याचे सर्वसमावेशक स्वरूप अधोरेखित केले. “महाकुंभ केवळ त्याच्या भव्यतेसाठीच नव्हे, तर त्याच्या विविधतेसाठीही ओळखला जातो. येथे भेदभावाला जागा नाही. विविधतेतून एकतेचे दर्शन महाकुंभाद्वारे घडते,” असे मोदींनी सांगितले.
महंत रवींद्र पुरी यांच्या विधानावर अखिल भारतीय मुस्लिम जमात यांसारख्या गटांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, हिंदुं व्यतिरिक्त इतर धर्माच्या लोकांना दुकान उघडण्यास मज्जाव केल्यास समाजात फूट पडू शकते आणि उत्सवाच्या एकात्मतेच्या भावनेला बाधा येऊ शकते.
महाकुंभ मेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर प्रयागराज शहरात स्वच्छता, टिकाऊपणा, आणि अद्ययावत पायाभूत सुविधा उभारण्यासाठी व्यापक उपाययोजना केल्या जात आहेत. लाखो भाविक आणि पर्यटकांच्या उपस्थितीसाठी शहर जागतिक स्तरावरील सोयी-सुविधा पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे.महाकुंभाचे पवित्र आणि सर्वसमावेशक स्वरूप जपण्यासाठी हे महत्त्वाचे प्रयत्न केले जात आहेत.
Leave a Reply