आतापर्यंत हिरे व्यापाऱ्याने कर्मचाऱ्यांना कार भेट दिल्याच्या तुम्ही अनेक बातम्या ऐकल्या किंवा वाचल्या असतील. अशीच एक बातमी आता राज्यातील नक्षलवादी भागातील गडचिरोली येथून समोर आली आहे. इथं कुठल्या व्यापाऱ्याने नाही तर, एका मेटल कंपनीने कर्मचाऱ्यांना कोट्याधीश केलं आहे. कंपनीने १३३७ रुपये किंमतीचे शेअर्स केवळ ४ रुपयांना आपल्या कर्मचाऱ्यांना दिले. लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड असे या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी लोखंडाची खाण चालवत असून स्टील कॉम्प्लेक्स विकसित करते.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी, आपले १३३७ रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शेअर्स ४ रुपये प्रति शेअर या नाममात्र किंमतीवर कामगारांना देण्यात आले. बरेच कर्मचारी दुर्गम आदिवासी भागातील आहेत. यातील काही तर पूर्वाश्रमीचे माओवादी देखील आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल कामगारांना नाममात्र दरात शेअर्स देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्मश्री पुरस्कार विजेते तुलसी मुंडा आणि एलएमईएलच्या ओडिशा युनिटमधील एक आदिवासी सामाजिक कार्यकर्ता आणि २ आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना हे शेअर सर्टिफिकेट दिले. कंपनीने तुलसी मुंडा यांना अंदाजे १ कोटी ३० लाख रुपये किमतीचे १०,००० शेअर्स दिले . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या शेअर वाटप कार्यक्रमात कामगारांना संबोधित करताना म्हणाले की, “तुम्ही सर्व शेअरधारक लोक आता कंपनीचे मालक आहात.” यावेळी त्यांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी प्रभाकरन यांचे कौतुक केले आणि सांगितले की, जिथे कोणी गेले नव्हते तिथे खाणकाम सुरू करण्याचे धाडस त्यांनी दाखवले आहे. फडणवीस पुढे म्हणाले की, आणखी ५ वर्षे वाट पाहा, तुम्हाला पाचपट परतावा मिळेल. जर बी प्रभाकरन व्यवस्थापकीय संचालक असतील तर तुम्ही सर्वजण कंपनीचे मालक आहात. प्रत्येकाला किमान १०० शेअर्स देण्यात आले. या कंपनीने अनुभव आणि दीर्घ कामाचे तास असलेल्या कामगारांना अधिक शेअर्स दिले आहेत. किमान २ वर्षे काम केलेल्या कर्मचाऱ्यांना किमान १०० शेअर्स मिळाले आहेत… या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Leave a Reply