मुंबईची ओळख बनलेला, आमचे मित्रवर्य अशोक ठाकूर यांचा , ‘अशोक वडा पाव’ नुकताच TasteAtlas च्या “जगातील सर्वात आयकॉनिक सँडविचेस” च्या यादीत २५व्या क्रमांकावर झळकला आहे. याआधी सुप्रसिद्ध टेस्ला कारच्या जाहिरातीत , मित्रवर्य अशोक आणि त्यांचा चवदार बटाटे वडा सहभागी झालेला पाहून , हा वडापाव आनंदाने खाणाऱ्या , तमाम मुंबईकरांचा उर आनंदाने भरून आला होता … कारण अशोक यांची ही अर्धशतकाची खाद्ययात्रा आहेच विलक्षण भन्नाट …
१९६६ पासून दादरमधील किर्ती महाविद्यालयाजवळ असलेला हा वडापावचा स्टॉल, म्हणजे मुंबईतील एक आयकॉनिक ठिकाण आहे . अनेक पिढ्यांपासून वडापाव प्रेमी, विद्यार्थी, प्रवासी आणि सेलिब्रिटींना आकर्षित करत आहे.
शिवसेनेच्या उगमाशी ज्याचा संबंध आहे , त्या वडा पाव या संकल्पनेचा शोध साठच्या दशकात दादर रेल्वे स्थानकाजवळील विक्रेते, अशोक वैद्य यांनी लावल्याचे मानले जाते. त्यांनी पारंपरिक महाराष्ट्रीयन बटाटा वडा आणि पाव यांना एकत्र करून गिरणी कामगार आणि प्रवाशांसाठी झटपट, चविष्ट आणि परवडणारा खाऊ तयार केला. पुढे , मराठी माणसाला रोजगारासाठी प्रोत्साहन देणाऱ्या शिवसेनेनेही, वडा पावला सर्वसामान्य कामगारांचा आदर्श नाश्ता म्हणून पसंती दिल्यामुळे त्याची लोकप्रियता आणखी वाढली. त्यामुळे , त्यात प्रयोग करणारे लोकही वाढत गेले . आमचा अशोक त्यातील एक धडपड्या तरुण . ज्याने वयाचे सतरा, अठराव्या वर्षीच , या व्यवसायात उडी घेतली आणि दोन्ही पाय घट्ट रोवून उभा राहिला. अगदी आजपर्यंत , वयाची सत्तरी जवळ आली असतानाही , एखाद्या तरुणाला लाजवेल अशा ऊर्जेने , उत्साहाने आणि आनंदाने, अशोक काम करताना, आलेल्या लोकांशी बोलताना दिसतात .
प्रत्येक शहराची एक ओळख असते , मुख्य म्हणजे , ती खाद्यपदार्थांशी निगडित असते . तसाच , वडा पाव, ही मुंबईची ओळख आहे . तिखट , गोड चवीचा एकाच वेळी अनुभव देणारा हा पदार्थ , तसा खाण्यास सोपा… अगदी , तो चालता-बोलता देखील खाता येतो, त्यामुळे मुंबईच्या धकाधकीच्या जीवनशैलीसाठी तो अगदी योग्य ठरतो. त्याचा साधेपणा, परवडणारी किंमत आणि मुंबईच्या ‘कष्टाळू’ संस्कृतीशी असलेले नाते, यामुळे वडा पाव केवळ एक खाद्यपदार्थ नसून शहराचे सांस्कृतिक प्रतीक बनला आहे.
मित्रवर्य अशोक यांनी , या मुंबईच्या सांस्कृतिक प्रतीकाच्या डोक्यावर आपल्या कष्टाने , कल्पकतेने आंतरराष्ट्रीय सन्मानाचा मुकुट चढवला आहे . हे विशेष .
आज आपल्या नित्य परिचयाचा झालेला पाव, हा मऊ ब्रेडचा प्रकार, पोर्तुगीजांनी भारतात आणला होता. त्यात मसालेदार बटाटा वडा भरून तयार झालेला वडा पाव, हा चव आणि पोटभर आनंद देणारा , उत्तम पदार्थ ठरला. त्याने भल्या भल्याना भुरळ घातली. अशोक यांच्या जगप्रसिद्ध ग्राहकांच्या यादीत असंख्य नावे आहेत . कोण वडापाव साठी येतात , तर कुणाला चुरा -पाव शिवाय चैन पडत नाही … अगदी , प्रसिद्ध गायक ब्रायन अॅडम्स यांनीही वडा पावला “सर्वात स्वादिष्ट व्हेगन स्ट्रीट फूड” अशी मान्यता देऊ केली आहे . ती उगाच नाही .
अशोक यांच्या वड्यासोबत, खास चवीची चटणी हे विशेष आकर्षण आहे . त्यासाठी अशोक , त्यांच्या पत्नी , मुले आणि सर्व सहकारी घेत असलेले कष्ट अफाट आहेत . त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही . पण आपल्या आईकडून प्रेरणा घेऊन , एक कोवळा तरुण एक मिशन घेऊन कामाला लागतो आणि यशासोबत नावही कमावतो . ही कहाणी फार प्रेरणादायक आहे . आजही मुंबईच्या रस्त्यावरील वडापाव विक्रेते नारळ-लसूण चटणी, चिंचेची चटणी आणि तळलेल्या मिरच्यांसोबत वडा पाव देतात. काही ठिकाणी चीज आणि फ्युजन फ्लेवर्सचे प्रयोगही केले जातात. मात्र कितीही बदल झाले तरी, आपल्या लाडक्या वडा पावचे मूळ स्वरूप कायम आहे. चवदार ,चटपटीत असा हा वडा पाव, मुंबई , ठाणे , कोकण , पालघर … आणि हो आमच्या वाड्यातील बायचुंच्या वड्यासारखा, खोपोलीतील रमाकांत, प्रभादेवीचा सारंग, जुन्या कल्याणचा ‘खिडकी वडा’ किंवा आताचा खडक पाड्यातील आमच्या बबलूचा खमंग वडा पाव,
गावोगावच्या खवय्यांची रसना तृप्त करत असतो … अशोक यांचा वडा-पाव , आज जगातील पहिल्या पंचवीस सँडविचमध्ये जेव्हा मानाने बसला … तेव्हा , या मुंबई – महाराष्ट्रातील , देशाविदेशातील, तमाम वडापाव तयार करणारे कुशल कारागीर नक्कीच आनंदले असतील ….
वडापाव या पदार्थाला मान -मान्यता मिळवून देणाऱ्या या अनोख्या व्यक्तिमत्वाची शासकीय पातळीवर दखल घेतली गेली पाहिजे . मुंबईला नाव मिळवून देणार्या या मंडळींना, किमान महापालिकेने, त्यांच्या उद्योगधंद्यांना त्रास देऊ नये … एव्हढे केले तरी पुरे आणि निवडणूक आल्यावर शिव वडापाव वैगेरे घोषणा देणाऱ्या राजकारणी मंडळींनी , आपल्या कामाप्रती निष्ठा कशी असावी , हा एक धडा जरी आमच्या वडापाव सम्राट अशोक यांच्याकडून घेतला तरी पुरे … आणखी काय बोलावे …
अशोक राव … तुम्ही मुंबईकरांना , इथल्या असंख्य पिढयांना चवीने खायला शिकवले आहे … कित्येकांचे आईच्या मायेने पोट भरले आहे… त्यामुळे , तुमचे नाव आणि काम, कायम राहणार… लौकरच तुमचा जाहीर सत्कार करण्याचा , मुलाखत घेण्याचा योग येवो , हीच अपेक्षा …
*महेश म्हात्रे*
संपादक
महाराष्ट्र रिसर्च सेंटर


Leave a Reply