गेल्या काही दिवसांपूर्वी ‘सामना’ वृत्तपत्रातून गडचिरोलीतील विकासकामांच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले होते. याच मुद्द्यावर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही माध्यमांशी बोलताना सकारात्मक टिप्पणी केली होती. गुरुवारी, पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांची भेट घेतली, जी मागील महिन्यातील तिसरी भेट ठरली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
आदित्य ठाकरेंनी यांनी आज मुंबईत फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ठाकरे त्यांना तीनदा भेटले आहेत. एकदा उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्रितपणे फडणवीसांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कार्यालयात भेट झाली होती. लोकांसाठी विरोधक आणि सत्ताधारी यांनी एकत्रितपणे काम करायला हवे, अशी भूमिका आदित्य ठाकरे सातत्याने मांडत आहेत
भेटीत काय चर्चा झाली?
फडणवीसांना भेटल्यानंतर आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. या भेटीत मुंबईतील विविध समस्या चर्चेसाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “मुंबईतील समस्यांवर चर्चा करण्यासाठी मी आज मोकळ्या मनाने आलो होतो. मुंबईतील निवृत्त पोलिसांना घरे मिळावीत, तसेच सर्वांसाठी पाणीपुरवठा योजना लागू करावी, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली,” असे त्यांनी सांगितले.
मुंबईतील पाणीप्रश्नाबाबत त्यांनी फडणवीसांच्या सकारात्मक भूमिकेचा उल्लेख केला. याशिवाय, टोरेस कंपनीतील घोटाळ्याविषयीही चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी होर्डिंग समस्येबाबत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना पत्र लिहिले होते, त्यावरही या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता आहे.
Leave a Reply