नागपूर जिल्ह्यात सोशल मीडियाद्वारे चुकीची आणि संवेदनशील माहिती प्रसारित केल्याच्या आरोपाखाली १९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये चार अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या आरोपींवर धार्मिक तेढ निर्माण करणे, समाजात वैमनस्य पसरवणे आणि विशिष्ट समुदायाचा अपमान केल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत.
नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार यांनी सांगितले की, आरोपींच्या सोशल मीडिया खात्यांची चौकशी सुरू असून, मोबाईल फॉरेन्सिकच्या मदतीने त्यांचा डेटा आणि आयपी अॅड्रेस तपासला जात आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये १९ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हे नोंदवले असून, या प्रकरणांत जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे त्वरित अटक शक्य नसली तरी महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट प्रसारित करणाऱ्या काही प्रमुख व्यक्तींची ओळख पटवली आहे. त्यामध्ये ‘सुन्नी युथ फोर्स ऑफिशियल’ या इंस्टाग्राम ग्रुपचा प्रशासक फहीम शमीन खान याचा समावेश आहे. त्याने सोशल मीडियावर भडकावू मजकूर प्रसारित केल्याचे उघड झाले आहे. तसेच, अर्शीद शेख आणि अनस शेख यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नागपूर पोलिसांनी सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. शहर आणि ग्रामीण भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, शांतता समित्यांच्या बैठका घेऊन विविध समुदायांच्या नेत्यांशी चर्चा करण्यात येत आहे.
१७ मार्च रोजी झालेल्या नागपूर हिंसाचारानंतर पोलिसांनी सोशल मीडियावरील हालचालींवर अधिक बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रविंदर सिंगल यांनी नागरिकांना कोणतीही संवेदनशील किंवा चिथावणीखोर माहिती सोशल मीडियावर शेअर न करण्याचे आवाहन केले आहे.
Leave a Reply