कल्याणमध्ये शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांमध्येच रस्त्यावरच धुमश्चक्री उडाल्याची घटना घडली. एका रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या श्रेयावरून झालेल्या वादाने गटातटाच्या संघर्षाला तोंड फोडलं. माजी नगरसेवक मोहन उगले आणि महिला शिवसैनिक राणी कपोते यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. समर्थकांनीही घोषणाबाजी करत वातावरण अधिक तापवलं.
विशेष म्हणजे, या रस्त्याच्या उद्घाटनासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांचे सुपुत्र वैभव भोईर उपस्थित होते. मात्र, त्यांच्या समोरच हा गोंधळ झाल्याने त्यांनी घाईघाईने कार्यक्रम उरकून तेथून काढता पाय घेतला. या प्रकाराची कल्याणमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.
मोहिंदर सिंग काबूल सिंग परिसरात या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आयोजित करण्यात आला होता. आमदार भोईर अनुपस्थित असल्यानं त्यांच्या जागी मुलगा वैभव भोईर कार्यक्रमासाठी हजर होता. माजी नगरसेवक मोहन उगले यांनी शुभारंभाचा नारळ फोडण्याचा प्रयत्न केला, तेव्हाच शिवसेना महिला कार्यकर्त्या राणी कपोते यांनी आक्षेप घेतला आणि घोषणाबाजी सुरू केली. यामुळे दोन्ही गट समोरासमोर येत गोंधळ उडाला.
मोहन उगले यांनी हा रस्ता आपल्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्याचा दावा केला, तर राणी कपोते यांनी त्याला जोरदार विरोध केला. “जर रस्त्याची फाईल आधीच रद्द झाली होती, तर माजी नगरसेवकांनी तेव्हा का पाठपुरावा केला नाही?” असा सवाल कपोते यांनी उपस्थित केला.
कल्याणमधील या वादाने शिवसेनेत अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. पक्षाच्या कार्यक्रमातच कार्यकर्त्यांमध्ये अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण होणे, पक्षाच्या प्रतिमेसाठी धोकादायक असल्याचं मत काही नेत्यांनी व्यक्त केलं आहे. श्रेयवादावरून होणारे आरोप-प्रत्यारोप टाळण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी यामध्ये हस्तक्षेप करायला हवा, अशीही चर्चा शिवसेना शिंदे गटात सुरू आहे.
Leave a Reply