राज्यात सध्या हवामानात सातत्याने बदल होत असून त्याचा तडाखा रविवारी मुरबाड तालुक्यातील टोकावडे व धसई परिसरातील शेतकऱ्यांना बसला. संध्याकाळच्या सुमारास गारांसह झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे दीड तासातच शेतीचे मोठे नुकसान झाले.या पावसात धसईजवळील अल्याणी गावातील १८ वर्षीय रविना सांडे या तरुणीच्या अंगावर वीज पडून तिचा मृत्यू झाला, तर तिचे वडील राजाराम सांडे हे जखमी झाले. दोघांना तातडीने टोकावडे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी रविनाला मृत घोषित केलं.
या अचानक आलेल्या पावसामुळे आंबा, कडधान्य व भाजीपाला पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही ठिकाणी काढणीसाठी तयार असलेले पीक जागीच खराब झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान अधिकच वाढले आहे.एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मुरबाड तालुक्यात ४३ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले होते. विदर्भातील अकोल्यानंतर सर्वाधिक तापमान ठाणे जिल्ह्यातील धसई भागात नोंदवण्यात आले होते. तापमानात चढ-उतार सुरू असतानाच गेल्या आठवड्यातही अवकाळी पावसाचा फटका बसला होता आणि आता पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाली आहे.
हवामान खात्याने रविवारी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता आणि तो अचूक ठरला. टोकावडे, धसईसह अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह गारपीटही झाली.याआधीही शहापूर, अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांत वादळी वाऱ्यासह आलेल्या गारपिटीमुळे फळबागांना मोठा फटका बसला होता. आता मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांनाही त्याचा फटका बसत असून हवामानाच्या या अनिश्चिततेने शेती संकटात सापडली आहे.
Leave a Reply