न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी फरार असलेला अरुणाचलम उल्लाहनाथन मारुथुवर अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. रविवारी (दि. १६) मारुथुवरने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा (EOW) कार्यालयात आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मारुथुवरवर घोटाळ्यातील मुख्य आरोपी हितेश मेहता याच्याकडून ३० कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. न्यायालयाने त्याला 18 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मारुथुवरचा शोध घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने देशभरात तपास सुरू केला होता. विविध ठिकाणी तपास पथके तैनात करण्यात आली होती. यापूर्वी मारुथुवरच्या मुलाला, वडिलांना फरार होण्यासाठी मदत केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये कपिल देधिया याला वडोदरा येथून अटक करण्यात आली होती. त्याला शनिवारी मुंबई न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
घोटाळ्याची व्याप्ती आणि प्रमुख आरोपी
• ‘न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक’ घोटाळ्यात १२२ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.
• बँकेच्या प्रभादेवी आणि गोरेगाव शाखांमधून हा गैरव्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे.
• या प्रकरणात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अभिमन्यू भोयान आणि १५ कोटी रुपयांचा अपहार करणारा मनोहर उन्नाथन यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
घोटाळा उघडकीस येण्याआधीच बँकेचे माजी अध्यक्ष हिरन भानू आणि माजी उपाध्यक्ष गौरी भानू हे विदेशात गेले आहेत. पोलिसांनी त्यांना फरार घोषित केलं आहे. याबाबतची माहिती पोलिसांनी दिली.
Leave a Reply