लाचखोरीवर भाषण आणि तासाभरात लाच घेताना पकडला गेला एसीबीचा अधिकारी

जयपूर : भ्रष्टाचाराविरोधी मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यानेच भ्रष्टाचाराचा कळस गाठल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानच्या सवाई माधोपुर येथे भ्रष्टाचार निरोधक विभागाचे (ACB) अॅडिशनल एसपी भैरूलाल मीणा यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं. विशेष म्हणजे, ही घटना त्यांच्या “लाचखोरी कशी चुकीची आहे” या विषयावर दिलेल्या भाषणानंतर केवळ एका तासात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, भैरूलाल मीणा यांनी सकाळी भ्रष्टाचारविरोधी जनजागृती कार्यक्रमात भाषण दिलं. कार्यक्रम संपल्यानंतर ते थेट सवाई माधोपुरच्या जिल्हा परिवहन अधिकारी (DTO) महेश चंद मीणा यांच्याकडून 80 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या दुसऱ्या पथकाकडून पकडले गेले. या कारवाईत महेश चंद मीणा यांनाही अटक करण्यात आली.

तपासादरम्यान एसीबीने भैरूलाल मीणा यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले असता, त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत तब्बल 400 टक्क्यांनी अधिक मालमत्ता आढळली. फक्त 32 महिन्यांच्या सेवाकालात त्यांनी सुमारे 65 लाख 50 हजार रुपये अवैध मार्गाने कमावल्याचं समोर आलं. या कालावधीत त्यांची वैध कमाई फक्त 15 लाख 75 हजार रुपये होती.

याच प्रकरणात पुढील चौकशीत जिल्हा आबकारी अधिकारी मधुसूदन सैनी आणि बाटोदा ठाण्याचे अधिकारी सुरेंद्रसिंग यांनाही लाच देण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. भैरूलाल मीणा हे पोलिस सेवेत शिपाई म्हणून रुजू झाले होते आणि पाच पदोन्नतीनंतर ते उपअधीक्षक बनले होते. एसीबीमध्ये वरिष्ठ अॅडिशनल एसपी म्हणून तैनात असताना त्यांनी या पदाचा गैरवापर करून लाचखोरीचं जाळं उभारल्याचं उघड झालं आहे.

एसीबीने आता त्यांच्या विरोधात आयपेक्षा अधिक संपत्तीचा स्वतंत्र गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास सवाई माधोपुर एसीबीचे प्रभारी सुरेंद्र शर्मा करत आहेत. या घटनेनंतर एसीबीच्या प्रतिमेला धक्का बसला असून, “रक्षकच भक्षक बनले” अशी चर्चा राज्यभर सुरू आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *