जालना : “2029 मध्ये युवानेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुका आम्ही लढवू आणि जिंकू. आदित्य ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील”, असा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. इतकंच नाही तर अमेरिकेत ट्रम्पच्या विरोधात ज्याप्रमाणे लोक रस्त्यावर उतरलेत तसं चित्र लवकरचं आपल्या देशात दिसेल, असा दावा देखील खैरे यांनी केला आहे. यादरम्यान त्यांनी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर देखील टीका केली.ते म्हणाले, रावसाहेब दानवे हा माणूस विचित्र आहे, 2019 च्या निवडणुकीत त्यांनी आमच्या माणसांना पैसे वाटले आणि माझा पराभव केला. हाच तुमचा प्रामाणिकपणा आहे का, अशी विचारणा दवखील खैरे यांनी केली.
आदित्य ठाकरे हे 2029 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री होतील : खैरे
यादरम्यान आदित्य ठाकरे यांच्याबाबत खैरे यांनी मोठा दावा केला आहे. ‘आदित्य ठाकरे हे 2029 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री होतील, असे धाडसाचे विधान त्यांनी केले. राज्यातील महायुती सरकारविरोधात सर्वसामान्य जनतेच्या मनात रोष आहे. शेतकरी, बेरोजगार तरुण, महिला, लाडक्या बहीणी, विद्यार्थी अशा सर्वांचीच फसवणूक झाली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव, लाडक्या बहीणींना 2100 रुपये अनुदान या निवडणुक प्रचारात दिलेल्या आश्वासनांचा सरकारला विसर पडला आहे.
आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विधानसभेच्या निवडणुका लढवू आणि जिंकू. आदित्य ठाकरे हेच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री होतील, या पुनरुच्चारही चंद्रकांत खैरे यांनी केला. मनमानी कारभार केला तर जनता उद्रेक करते, अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याविरोधात तो दिसतो आहे. तेथील अनेक राज्यातील लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. अशी परिस्थिती आपल्या देशाता निर्माण झाली तर नवल वाटायला नको, अशी टीकाही खैरे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केली.
Leave a Reply