पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर असून, सोमवारी रात्री ते फ्रान्सची राजधानी पॅरिसला पोहोचले. त्यांच्या आगमनानंतर त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. या दौऱ्यात मोदींनी AI समिटमध्ये भाषण केलं आणि विविध द्विपक्षीय चर्चाही पार पाडल्या. तसेच, ते ऐतिहासिक मार्सिलो शहरालाही भेट देणार आहेत.
मोदींनी AI बद्दल काय सांगितलं?
AI समिटला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आजच्या युगात AI ही काळाची गरज बनली आहे. भारताकडे जगातील सर्वांत मोठं टॅलेंट आहे. आम्ही नागरिकांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी भक्कम व्यवस्था उभारली आहे. सरकार खासगी क्षेत्राच्या सहकार्याने पुढे जात आहे. AI चे भविष्य अत्यंत उज्ज्वल असून, याचा फायदा संपूर्ण मानवजातीला होईल.”
“AI कोड फॉर ह्युमॅनिटी लिहिला जातोय” – मोदी
आपल्या भाषणात मोदी पुढे म्हणाले, “AI कोड फॉर ह्युमॅनिटी लिहिला जातो आहे. यामुळे लाखो आयुष्यं आमूलाग्र बदलणार आहेत. काळ बदलतो तसा रोजगाराचं स्वरूपही बदलतं. अनेकदा चर्चा होते की AI मुळे रोजगारांचं संकट निर्माण होईल. मात्र, इतिहास हेच सांगतो की कुठलंही तंत्रज्ञान नोकऱ्या हिसकावून घेत नाही. उलट, AI मुळे नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील.”
AI वर सखोल चर्चा गरजेची – मोदी
AI चा समाज, अर्थव्यवस्था आणि सुरक्षा क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम होत आहे, असं सांगत मोदी म्हणाले, “AI संदर्भातील काही जोखमी आहेत, त्यावर गहन चर्चा आणि विचारमंथन होणं आवश्यक आहे.”
AI परिषदेसाठी तब्बल १०० देशांचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित होते. या वेळी मोदी म्हणाले, “AI मध्ये हजारो आयुष्यं बदलण्याची ताकद आहे. समाज आणि सुरक्षेसाठी AI आवश्यक ठरणार आहे.” त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रो यांचे आभार मानले आणि “AI चा वेगाने विकास होत असून, डेटा गोपनीयता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे,” असंही स्पष्ट केलं.
Leave a Reply